जो हरणार, त्याचा ऑलिम्पिक प्रवास इथेच संपणार होता. दोघांनीही आपले सर्वस्व पणाला लावले होते. ‘जिंकू किंवा मरू’ असाच हा सामना होता. मात्र हिंदुस्थानच्या लक्ष्य सेनने 50 मिनिटांच्या संघर्षात जागतिक क्रमवारीत तिसऱया क्रमांकावर असलेल्या जोनाथन क्रिस्टीचा 21-18, 21-12 असा पराभव करत साखळीतील दोन्ही सामने जिंकले आणि पॅरिस ऑलिम्पिकच्या बॅडमिंटन पुरुष एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
हिंदुस्थानला नेमबाजीप्रमाणे बॅडमिंटनमध्येही पदकांची अपेक्षा आहे. मंगळवारी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सहज उपांत्यपूर्व फेरी गाठली, तर आज लक्ष्य सेनने पदकाच्या दिशेने मार्गक्रमण केले. क्रिस्टीने भन्नाट सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये 6-0 अशी सनसनाटी सुरुवात केली होती. सेन काहीसा विचलित झाला होता. सातवा पॉइंट सेनने जिंकत आपले खाते उघडले. एकवेळ 1-8 अशी पिछाडी होती लक्ष्यची; पण त्यानंतर सुसाट खेळ करत लक्ष्यने क्रिस्टीच्या प्रत्येक शॉटला यशस्वीपणे परतावत 8-8 अशी बरोबरी साधली आणि मग खेळाच्या मध्यावर 11-9 अशी आघाडी घेत सामन्यात चुरस निर्माण केली.
पिछाडीवरून आघाडीवर गेलेल्या लक्ष्यच्या वेगवान खेळाला चोख प्रत्युत्तर देण्यात क्रिस्टी काहीसा मागे पडला होता. पण त्यानेही योग्यवेळी पुनरागमन करत स्कोर 18-18 असा बरोबरीत आणला. सामन्याचा पहिला गेम दोलायमान स्थितीत होता. कुणीही गेम जिंकू शकत होता. इथेच लक्ष्यने बाजी मारली. त्याने सलग तीन गुण मिळवत पहिल्या गेमवर 21-18 असे आपले नाव लिहिले. 27 मिनिटांत लक्ष्यने आघाडी घेतली आणि दुसरा गेम 23 व्या मिनिटातच 21-12 असा सहज जिंकत सामनाही आपल्या नावावर केला. गटातील पहिल्या सामन्यातही लक्ष्यने बेल्जियमच्या ज्युलियन करागीचा 21-19, 21-14 असा पराभव केला होता.