>> मंगेश वरवडेकर
पॅरिस ऑलिम्पिकचे आपले एकच ध्येय आहे. आयफेलवर चढाई करत पदकांचा टॉवर उभारणे. आपल्या मनू भाकरने ती चढाई करायला सुरुवात केलीय. तीसुद्धा विक्रमांसह. 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात कास्य जिंकले. ही तर सुरुवात आहे. पण आरंभ है प्रचंड, असे म्हणावे लागेल. पुढे आपले ऑलिम्पिकवीर त्याच्यावर पदकांचा एकेक मजला चढवतील. आशा नव्हे, विश्वास आहे. अतिआत्मविश्वास तर मुळीच नाही. आपले वीर इथे पॅरिसमध्ये वीरता दाखवण्यासाठी आलेत. खाली हाथ आए थे हम, खाली हाथ जाएंगे, हे कधीच इतिहासजमा झालेय. आता तर पदकांची लूट करायचीय.
एक काळ असा होता की आपण एकेका पदकासाठी आसुसलेले असायचो. पदकांचा दुष्काळ आपल्या पाचवीलाच पुजलेला असायचा. 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी 57 किलो वजनी फ्रीस्टाईल कुस्तीत वैयक्तिक कास्य जिंकले. त्यानंतर वैयक्तिक कास्य जिंकण्यासाठी 42 वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. यादरम्यान केवळ हॉकीचा संघ कधी सोनं, कधी चांदी आणि कधी कास्य जिंकला. फक्त 1976 साली आपल्याला एकही पदक जिंकता आले नव्हते. म्हणजेच ऑलिम्पिक इतिहासात 1952 सालीच हिंदुस्थानला दोन पदकांचे भाग्य लाभले.
खाशाबांनी केलेल्या पदक पराक्रमाची बरोबरी करण्यासाठी लिएंडर पेसला 1996 सालची वाट पाहावी लागली. गेल्या तीन ऑलिम्पिकमध्ये (1984, 1988 आणि 1992) हिंदुस्थानी खेळाडू हात हलवतच परतत होते. आपल्या 100 कोटी लोकसंख्येच्या हिंदुस्थानसाठी ही फारच लाजिरवाणी बाब असायची. पण आता काळ बदललाय आणि वेळही. हिंदुस्थानच्या पदकांना पेस (वेग) दिला तो लिएंडरनेच. अटलांटात टेनिसचे कास्य जिंकल्यापासून हिंदुस्थानी पथक रिकाम्या हाताने परतत नसले तरी केवळ एकच पदक जिंकत होते. हे अपमानास्पदच होते. आपल्याकडे गुणवत्ता होती, पण ती ऑलिम्पिकच्या स्टेजवर गळपटायची. आपले खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्रही होत नव्हते. पण 2008 सालच्या बीजिंग ऑलिम्पिकने हिंदुस्थानी खेळाडूंवर अशी काही जादू केली की माहोलच बदलत गेला. सर्वात आधी अभिनव बिंद्राने हिंदुस्थानला पहिले वैयक्तिक सुवर्ण जिंकून दिले. 108 वर्षांनी का होईना, आपला खेळाडू वैयक्तिक स्पर्धेत गोल्डन बॉय ठरला. मग विजेंदर सिंगने मुष्टियुद्धात तर सुशील कुमारने कुस्तीत यशाचा झेंडा रोवत हिंदुस्थानच्या कामगिरीला रुपेरी झळाळी दिली. 108 वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात आपण प्रथम तीन पदके जिंकलो. 2008ने पेरलेल्या यशाच्या बीजांचे 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रोप झाले. आपला पदकांचा आकडा सहावर पोहोचला. 2016 साली आपण पुन्हा घसरलो. चक्क अपेक्षाभंग झाला. केवळ पी.व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक या महिला खेळाडूंनी लाज राखली. पण 2016चे अपयश टोकियो ऑलिम्पिकमध्ये धुऊन काढताना सेव्हन स्टार कामगिरी केली. नीरज चोप्राचा सुवर्णभाला संस्मरणीय ठरला.
टोकियोच्या यशाने हिंदुस्थानला जगात ओळख मिळवून दिलीय. आपण प्रथमच पहिल्या पन्नास देशांत पोहोचलो. तेव्हापासून गेल्या तीन वर्षांत हिंदुस्थानच्या नेमबाज, कुस्तीवीर, ऍथलीट, मुष्टियुद्ध, बॅडमिंटनपटूंनी जबरदस्त यश मिळवत पॅरिस गाजवण्याचे संकेत दिलेच होते. आता ते प्रत्यक्षात साकारलं जाणार इतकंच.
मनूने ती सुरुवात केलीय. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी मनूने कास्य जिंकण्याचा पराक्रम करत तमाम हिंदुस्थानींना गोड बातमी दिलीय. पुढच्या प्रकारात मनूकडून सोनेरी अपेक्षा असेल. विजयानंतर जरी ती म्हणाली असेल, कर्म कर फल की चिंता मत कर. मी तर म्हणेन फळाची चव चाखण्यासाठीच कर्म कर. ध्येय हे पदकाचेच असायला हवे. प्रतिस्पर्ध्यापेक्षा वरचढ लक्ष्य कसे गाठायचे याचीही चिंता असायलाच हवी. या पदकानिशी नेमबाजीत पदक जिंकणारी मनू पहिली खेळाडू ठरलीय. आतापर्यंत राज्यवर्धन राठोडपासून अभिनव बिंद्रा, विजय कुमार, गगन नारंग या चौघांनी पदके जिंकली होती. आता त्यात मनू पहिली महिला असेल. दुसऱ्याच दिवशी 140 कोटी हिंदुस्थानींची छाती अभिमानाने फुगलीय. हे क्षण आता वारंवार अनुभवायला मिळणार आहेत. आयफेलवर चढाई सुरू झालीय. पदकांचा टॉवर उभारला जाणार. पुढचे दोन आठवडे विक्रमांचेच असतील. हिंदुस्थानच्या क्रीडा पराक्रमांचे असतील. जल्लोषाच्या तयारीला लागा.