Paris Olymipcs 2024 – हरता हरता हरमनने वाचवले, हिंदुस्थानचा अर्जेंटिनाविरुद्धचा सामना 1-1 बरोबरीत

सामना संपायला शेवटची दोन मिनिटे होती. हिंदुस्थान 0-1 ने पिछाडीवर होता. मोजकीच उपस्थिती असलेल्या अर्जेंटिनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद झळाळत होता. मात्र हजारोंच्या संख्येने ‘जीतेगा भाई जीतेगा…’च्या घोषणा देणाऱ्या हिंदुस्थानी चाहत्यांचा जोश मावळत चालला होता. तेव्हाच पेनल्टी कॉर्नरवरून हार्दिक सिंगने मारलेल्या स्ट्रोकला गोलचे भाग्य कर्णधार हरमनप्रीत सिंगने मिळवून दिले आणि पराभवाच्या दिशेने झुकलेल्या सामन्यात हिंदुस्थानने अर्जेंटिनाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. आजच्या विजयामुळे हिंदुस्थानचे ब गटातून उपांत्यपूर्व फेरी प्रवेशाचे आव्हान कायम आहे. अजूनही तीन लढती कायम असून दोन विजय हिंदुस्थानचे अंतिम आठ संघांतील स्थान निश्चित करतील.

न्यूझीलंडचा पराभव करून सुरुवात करणाऱ्या हिंदुस्थानच्या जोशिल्या संघाला अर्जेंटिनाला धूळ चारण्याची संधी होती, पण वारंवार पेनल्टी कॉर्नरची संधी मिळूनही हिंदुस्थानच्या स्ट्रायकर्सला सोनं करता आलं नाही. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत खेळले गेले तेव्हा हिंदुस्थानच्या आक्रमकांनी अर्जेंटाइन गोलरक्षक टॉमस सॅण्टियागोवर हल्ले चढवले, पण ही अर्जेंटाईन भिंत कुणीही पाडू शकला नाही. दुसरे सत्रही तसेच जोरदार गेले. हिंदुस्थानचे पेनल्टी कॉर्नर वाया जात होते तसेच अर्जेंटिनाच्या पेनल्टी कॉर्नरला श्रीजेश उधळून लावत होता. 20 मिनिटांचा खेळ झाला असताना हिंदुस्थानचे दोन हल्ले सॅण्टियागोने रोखण्याची केलेली किमयाच प्रतिस्पर्ध्यांना गोलांपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरली. हिंदुस्थानी खेळाडूंना अपयश आले, पण 22 व्या मिनिटाला लुकास मार्टिनेझने हिंदुस्थानच्या बचावफळीला भेदले आणि पहिला गोल केला. त्यानंतर खेळल्या गेलेल्या 36 मिनिटांच्या खेळात केवळ उभय संघांचा संघर्ष पाहायला मिळाला.

मनप्रीत आणि अभिषेकचे हल्ले

दुसरे सत्र संपले. तिसरे सुरू झाले. हिंदुस्थानचा गोलसाठी सुरू असलेला संघर्ष संपता संपत नव्हता. तेव्हा अभिषेक आणि मनप्रीत सिंगने सॅण्टियागोला भेदण्यासाठी जोरदार खेळ केला. पण तो एखाद्या योद्धय़ासारखा सारे स्ट्रोक आपल्या छाताडावर झेलत होता. परिणामतः तिसऱ्या सत्रातही हिंदुस्थानला गोलाचे खाते उघडता आले नाही.

 बरोबरीत रोखल्यानंतरही विजयाचा जल्लोष

हिंदुस्थानने आजचा सामना हरता हरता बरोबरीत सोडवला. सामना बरोबरीत सुटताच हिंदुस्थानी चाहत्यांनी विजयासारखाच जल्लोष साजरा केला. त्यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. त्यांनी शेवटपर्यंत संघाची विजयाची आशा जिवंत ठेवली. त्यामुळे सामन्यानंतर हिंदुस्थानची देहबोली विजयासारखीच होती. सामना बरोबरीत सोडवणे हेसुद्धा विजयापेक्षा निश्चितच कमी नव्हते.