खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट झालाय का? तपासासाठी शासनाचे सीआयडीला पत्र

प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरच्या आई-वडिलांनी घटस्फोट झाल्याचे दाखवून कमी उत्पन्न दाखविण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकारने राज्य सरकारला खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट झाला आहे का? याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आणखी अडचणीत वाढ होण्याची आहे.

पूजा खेडकरने लोकसेवा आयोगाकडे नॉनक्रिमीलीअर प्रमाणपत्र सादर करून परीक्षा दिली होती. त्यानंतर त्यांचा प्रशिक्षणार्थी कालावधी महाराष्ट्रात सुरू होता. दरम्यान पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे उत्पन्न काही कोटींमध्ये होते. नॉनक्रिमीलिअरच्याबाबत विशिष्ट उत्पन्नाची अट आहे. परंतु, खेडकरचे वडील हे वर्ग एकचे अधिकारी होते. असे असताना त्यांचे उत्पन्न कमी कसे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने तिने आई-वडिलांचा घटस्पह्ट झाल्याचे सांगत नोकरी मिळवली होती.

मनोरमा खेडकर यांना कोठडी

शेतकऱयाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पौड न्यायालयाने हा आदेश दिला आहे. शेतकऱयाला धमकावल्याप्रकरणी खेडकर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पसार झालेल्या खेडकर यांना महाड येथून पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. याबाबत 65 वर्षीय शेतकऱयाने फिर्याद दिली आहे.