ग्लेनीईगल्स रुग्णालयातील 30 कर्मचारी झाले परमनंट, भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश

परळ येथील ग्लेनीईगल्स रुग्णालयातील 30 कंत्राटी कर्मचाऱयांना सेवेत कायम करण्यात आले आहे. हे सर्व रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करत होते. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे यासाठी भारतीय कामगार सेनेने रुग्णालय प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही टप्प्याटप्प्याने सेवेत कायम करण्यात येणार आहे, असे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

परळ येथील ग्लेनीईगल्स रुग्णालयात गेली कित्येक वर्षे शेकडो कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. या सर्व कर्मचाऱयांना सेवेत कायम करावे यासाठी भारतीय कामगार सेनेकडून पाठपुरावा केला जात आहे. शिवसेना नेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी, भारतीय कामगार सेना चिटणीस सूर्यकांत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी आणि ग्लेनीईगल्स हॉस्पिटल भारतीय कामगार सेनेचे युनिटप्रमुख-माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आला. यात पहिल्या टप्प्यात रुग्णालयातील 30 कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करण्यात आले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांनादेखील भविष्यात टप्प्याटप्प्याने सेवेत कायम करण्यात येणार आहे, असे आश्वासन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने रुग्णालयाचे सीईओ बिपन चेवले आणि कॉर्पोरेट एचआर जहानारा यांनी दिले. या कामी प्रशासनाबरोबर ज्या बैठका घेण्यात आल्या त्या बैठकांमध्ये ग्लेनीईगल्स हॉस्पिटल भारतीय कामगार सेनेचे स्थानिक युनिटमधील महेश मोरे, विनेश कोलतेकर, विलास कांबळे, संदीप म्हाबद्दी, विकास आयरे यांचा सहभाग होता. दरम्यान, सेवेत कायम केल्याबद्दल सर्व कर्मचाऱयांनी शिवसेना, भारतीय कामगार सेना आणि रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले आहेत.