परभणीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याच्या घटनेनंतर संतप्त जनतेने या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदवेळी हिंसाचार उफाळला होता. या प्रकरणी परभणीमध्ये कोबिंग ऑपरेशनच्या नावाखाली निर्दोष युवकाचा घेतलेला बळी हा सरकारी व्यवस्थेने केलेला खून असल्याचा संताप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. या घटनेवरून त्यांनी आपल्या X वरील अधिकृत अकाउंटवरून सरकारवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, परभणीमध्ये combing operation च्या नावाखाली निर्दोष युवकाचा घेतलेला बळी हा सरकारी व्यवस्थेने केलेला खून आहे. धनदांडग्याना सूट देणारी, त्यांच्यावर कारवाई करताना हलगर्जीपणा करणारी यंत्रणा सर्वसामान्य जनतेवर कारवाई करताना मात्र हिटलरप्रमाणे तुटून पडते हे खूप दुर्दैवी आहे. राज्य सरकारने दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी यांवेळी केली.
परभणीमध्ये combing operation च्या नावाखाली निर्दोष युवकाचा घेतलेला बळी हा सरकारी व्यवस्थेने केलेला खून आहे. धनदांडग्याना सूट देणारी, त्यांच्यावर कारवाई करताना हलगर्जीपणा करणारी यंत्रणा सर्वसामान्य जनतेवर कारवाई करताना मात्र हिटलरप्रमाणे तुटून पडते हे खूप दुर्दैवी आहे. राज्य… https://t.co/QwO3cRtT8X
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 16, 2024
परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची 10 डिसेंबर रोजी काही समाजकंटकांनी तोडफोड करून विटंबना केली होती. या घटनेच्या निषेधार्थ 11 डिसेंबर रोजी संतप्त जनतेने परभणी बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. या हिंसाचारानंतर परभणी पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन राबवत आंबेडकरी कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. या हिंसाचार प्रकरणी 27 जणांना अटक करून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या 27 जणांमध्ये सोमनाथ व्यकंट सूर्यवंशी या 35 वर्षांच्या तरुणाचाही समावेश होता. त्याची 14 डिसेंबर रोजी सायंकाळी न्यायालयीन कोठडीत असताना प्रकृती बिघडली. त्याला 15 डिसेंबर रोजी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.