पैसे नको, न्याय द्या! सूर्यवंशी कुटुंबीयांनी सरकारची 10 लाखांची मदत धुडकावली

माझ्या निरपराध मुलाचा पोलिसांनी जीव घेतला आहे. पोलीस कोठडीत सोमनाथला अमानुष मारहाण करणाऱ्या सर्व पोलिसांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री माझे लाडके भाऊ आहेत आणि मी त्यांची लाडकी बहीण आहे. मला न्याय मिळेपर्यंत सरकारची कोणतीही मदत स्वीकारणार नाही, असे म्हणत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने सरकारने देऊ केलेली 10 लाख रुपयांची आर्थिक मदत धुडकावून लावली.

परभणीत गेल्या महिन्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ासमोर असलेल्या संविधानाची माथेफिरूने विटंबना केली होती. या घटनेनंतर परभणी शहरात दंगल उसळली. पोलिसांनी रात्री-अपरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून निरपराध तरुणांना ताब्यात घेतले. यात कायद्याचे शिक्षण घेणाऱया सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू मारहाणीमुळे नाही, तर त्यांना जुनाच श्वसनाचा रोग होता असा जावईशोध लावण्यात आला. पोस्टमॉर्टम अहवालाने पोलिसांसह सरकारचेही पितळ उघडे पाडले. या अहवालात शरीरावर अनेक मारहाणीच्या जखमा आढळल्याचे स्पष्ट म्हटले आहे. विधिमंडळात या प्रकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूर्यवंशी कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. सरकारची मदत घेऊन आज प्रशासकीय अधिकारी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी पोहोचले, मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजया सूर्यवंशी यांनी न्याय मिळेपर्यंत आपण सरकारची कोणतीही मदत स्वीकारणार नाही, असे ठणकावून सांगितले. पोलिसांनी माझ्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या केली आहे. सरकारने गुन्हेगारांना फासावर लटकवावे, अशी माझी विनंती असल्याचेही त्या म्हणाल्या.