
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परभणीच्या जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे आणि क्रीडाधिकारी नानकसिंग बस्सी यांना 1.50 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी परभणी येथील जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातच करण्यात आली.
मानवत येथील क्रीडा अकादमीच्या एका तक्रारदाराने 2024 मध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. तसेच त्यांच्या क्रीडा अकादमीच्या जागेवर 90 लाख रुपयांचे स्वीमिंग पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले होते. या कामांबाबत 90 लाख रुपयांचे बिल व 5 लाख रुपयांच्या क्रीडा स्पर्धांचे बिल परभणी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात प्रलंबित होते. याच बिलांच्या मंजुरीसाठी कविता नावंदे आणि नानकसिंग बस्सी यांनी 2.50 लाख रुपयांची लाच मागितली होती.
लाच मागणीची पडताळणी आणि कारवाई
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर 24 मार्च रोजी प्राथमिक पडताळणी करण्यात आली. आज दुपारी पंचासमक्ष सापळा रचण्यात आला. यावेळी नानकसिंग बस्सी यांनी स्वतःसाठी 50,000 रुपये आणि कविता नावंदे यांनी 1,00,000 रुपये स्वीकारले. त्यानंतर तत्काळ दोघांनाही लाचेच्या रकमेसह अटक करण्यात आली.
दोघांवर लाचखोरीचा गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलीस ठाणे नवामोंढा, परभणी येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7 आणि ‘7–अ’नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे नानकसिंग बस्सी यांच्यावर यापूर्वीही बीड जिह्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल आहे आणि जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांची आठ दिवसांपूर्वीच आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱयाकडे पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
या अधिकाऱयांनी केली कारवाई
या कारवाईत पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी आणि त्यांच्या सहकाऱयांचा समावेश होता. कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
घरझडतीत रोख रक्कम जप्त
अटक केल्यानंतर कविता नावंदे यांच्या परभणी येथील घरातून 1.05 लाख रुपये तर बस्सी यांच्या ताब्यातून 50 हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींच्या छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नांदेड येथील मालमत्तांची तपासणी सुरू आहे.
कविता नावंदे यांच्यावर असलेले इतर आरोप
दरम्यान, कविता नावंदे यांच्यावर यापूर्वीही गैरव्यवहारांचे अनेक आरोप करण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही परभणी जिह्यातील दोन आमदारांनी त्यांच्या कारभाराबद्दल विधिमंडळ सभागृहात लक्षवेधी मांडली होती. त्यातच एसीबीच्या अधिकाऱयांनी आज धाड टाकून त्यांना 1.5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी गौतम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन मंजूर करण्यासाठी पैसे मागितल्याचा कुटुंबाच्या आरोपावरूनच राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी लक्षवेधी मांडली होती. हाच मुद्दा घेऊन शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनीही नावंदे यांना निलंबित करण्याची मागणी अधिवेशनात केली होती. याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी मुंडे यांनाही क्रीडा स्पर्धेचे बिल काढण्यासाठी पैसे मागितल्याची कविता नावंदे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.