जीव जावा इतकी मारहाण पोलिसांनी का केली, त्यांना काय लपवायचं आहे? सोमनाथ मृत्यूप्रकरणी वडेट्टीवार यांचा सवाल

परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा कारागृहातच मृत्यू झाला. याच प्रकरणावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘एक्स’वर एक पोस्ट करत त्यांनी प्रश्न विचारला आहे की, ”परभणी प्रकरणातील मृत भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांची पोलिसांनी केलेली ही हत्या आहे का? सुर्यवंशी यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालात पुढे आले आहे. एखाद्याचा जीव जावा इतकी मारहाण पोलिसांनी का केली? पोलिसांना मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले होते? पोलिसांना काय लपवायचे होते?”

विजय वडेट्टीवार म्हणाले की, ”अहवालात सोमनाथ सुर्यवंशी यांना अनेक जखमा झाल्याचा उल्लेख आहे आणि पोलीस सांगत होते हार्ट अटॅक आला? यावरून पोलिसांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस आंबेडकरी जनतेवर बळाचा वापर करत होते, मारहाण करत होते. याचे व्हिडीओ सुर्यवंशी यांनी काढले, हा राग पकडून पोलिसांनी सुर्यवंशी यांना अमानुष मारहाण केली का?”

वडेट्टीवार पुढे म्हणाले, सोमनाथ सुर्यवंशी यांचा हा मृत्यू नाहीतर पोलिसांनी केलेली हत्या आहे का? असा प्रश्न आज निर्माण होत आहे. या प्रकरणी जबाबदार पोलीस अधिकारी निलंबित झालेच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.