मणिपूरच्या जीरीबाम येथे अज्ञात हल्लेखोरांनी सीआरपीएफ आणि राज्य पोलीस दलाच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. घात लावून हा हल्ला करण्यात आला असून यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे, तर 3 पोलीस जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी हा हल्ला झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफचे पथक आणि जीरीबाम जिल्हा पोलिसांचे पथक संयुक्तपणे ऑपरेशन राबवत होती. याच दरम्यान हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात सीआरपीएफमधील पॅरा कमांडो शहीद झाला, तर तीन पोलीस जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
जीरीबाम पोलीस स्थानकांतर्गत येणार्या मोनबंग गावाजवळ हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात जीरीबाम पोलीस स्थानकाचे एसआयसह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. अजय कुमार झा (वय- 43) असे शहीद जवानाचे नाव असून ते बिहारमधील रहिवासी होते.