प्रयोगानुभव- लग्नसंस्था सजगतेच्या, सहजतेच्या चौकटीतून

>> पराग खोत

‘लग्न झालेल्या, लग्न होऊ घातलेल्या आणि लग्न न झालेल्या प्रत्येकासाठी’ अशी वेधक टॅगलाईन असणारं ‘वरवरचे वधूवर – एक सुविहित सावळागोंधळ’ हे नाटक प्रत्येकाने काहीसे अंतर्मुख होऊन पाहावे असे. रिलेशनशिपकडे सजगपणे पाहायला लावणारी ही तुमचीआमची गोष्ट.

इंग्रजीत एक वचन आहे, Re-read your favourite books at different stages of your life. The plot never changes, but your perspective does. लग्नाचं काहीसं तसंच आहे. लग्न संस्था अस्तित्वात आल्यापासून त्याची गरज आणि फायदे-तोटे आहेत तसेच आहेत. फक्त प्रत्येक पिढीचा त्याकडे पाहण्याचा perspective बदलतोय आणि अशाच एका वेगळ्या दृष्टिकोनाचा, उभा आडवा छेद घेणारा एक निखळ आणि आनंददायी अनुभव म्हणजे नाटक ‘वरवरचे वधूवर – एक सुविहित सावळागोंधळ’. ‘लग्न झालेल्या, लग्न होऊ घातलेल्या आणि लग्न न झालेल्या प्रत्येकासाठी’ ही या नाटकाची टॅगलाइन आहे. थोडक्यात प्रत्येकानेच काहीसे अंतर्मुख होऊन पाहावे आणि त्याची मजा घ्यावी किंवा धमाल करत पाहताना अंतर्मुख व्हावे असे हे नाटक आहे.

उच्चशिक्षित आणि भारी पगाराची नोकरी असलेले कॉर्पोरेट्समधले दोन तरुण-तरुणी, त्यांच्या इच्छा, अपेक्षा, त्यांची लाइफस्टाइल आणि लग्नाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हे या नाटकाचे कथाबीज. या दोघांचे अजून लग्न झालेले नाही, पण घरच्यांनी लग्नाचा धोशा लावल्याने त्यांचे शोधकार्य सुरू आहे. अर्थात खाये वो पछताये और न खाये वो भी पछताये वाला ‘शादी का लड्डू’ त्यांनाही खाऊन बघायचा आहेच. पण करीअर, पैसा आणि स्वच्छंदी आयुष्य या सगळ्या धबडग्यात, हे शिंचं लग्न कसं बसवता येईल याबद्दल त्यांच्या मनात गोंधळ सुरू आहे. अशातच एका विचित्र परिस्थितीत ते एकमेकांच्या समोर येतात आणि मग सुरू होते ती मनोरंजक रोलरकोस्टर राइड. त्या दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचे स्वभावविशेष, त्यांच्या इच्छा-आकांक्षा आणि या सगळ्यांचा त्यांच्या होऊ घातलेल्या नात्यावर होणारा परिणाम, एका वेगळ्या आणि हलक्याफुलक्या पद्धतीने मांडत आणि खुलवत जाणारं हे नाटक आहे. एखाद्या समस्येला विनोदाची डूब दिली की, तिची दाहकता कमी करून ती सकारात्मकरीत्या कशी सोडवता येऊ शकते याचं हसता हसवता प्रात्यक्षिक दाखवणारं हे नाटक आहे. नाटकात तीनच पात्रं आहेत. नायक, नायिका आणि सूत्रधार. नाटकाची आणि त्यातल्या पात्रांची ओळख करून देणं आणि काही प्रसंगांत नाटकाला गती देऊन पुढे नेणं ही सूत्रधाराला दिलेली कामं तो चोख करतो. पण नाटकाची गोष्ट मांडणं, त्यातल्या विविध आणि कधीकधी चमत्कृतीपूर्ण प्रसंगांची गुंफण, त्यातून होणारी विनोद निर्मिती आणि प्रेक्षकांना स्मितहास्यापासून हास्याच्या गडगडाटापर्यंत नेण्याची संपूर्ण जबाबदारी नायक, नायिकेला दिली आहे आणि ते दोघेही ती प्रेक्षकांच्याच टाळ्यांच्या कडकडाटात यशस्वीपणे पार पाडतात. नाटकातील खुसखुशीत प्रसंग आणि त्यात पेरलेल्या छोटय़ा छोटय़ा जागा घेत, कधी Obvious, तर कधी Subtle विनोद निर्मिती करत ही दोघं नाटकाचा तोल उत्तम सांभाळतात. लेखक, दिग्दर्शकाने बांधून दिलेल्या चौकटींच्या आतबाहेर राहत आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटविण्यात ती दोघं यशस्वी ठरली आहेत हे निर्विवाद. विराजस कुलकर्णी हा कलेचा वारसा घेऊन आलेला तरुण कलावंत. आधी टीव्हीवरच्या मालिकेत, नंतर एका इंग्रजी दीर्घांकात आणि त्यानंतर ‘गालिब’ या वेगळ्या वाटेवरच्या नाटकातील त्याचा वावर आश्वासक वाटला होता. इथे मात्र तो वेगळ्या भूमिकेत आहे. या नाटकात लेखक-दिग्दर्शक आणि गीतकार अशी तिहेरी कामगिरी करणाऱया विराजसने आपल्या या प्रयत्नात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही, अशी कामगिरी केली आहे. Captain of the ship या नात्याने त्याने नाटक उत्तमरीत्या बांधले आहे. त्यातले अनेक छोटे प्रसंग, त्यातल्या भन्नाट मूव्हमेंट्स आणि नाटकातल्या प्रॉपर्टीचा केलेला अफलातून वापर एकंदर नाटकालाच एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. सोबतच कलावंतांच्या ऊर्जेचा योग्य वापर करणाऱया जागा त्याने लेखनातच निर्माण केल्या आहेत आणि दिग्दर्शनातून त्या सुयोग्य रीतीने खुलवल्या आहेत.

नाटकातील भाषेचा लहेजा हा आजच्या पिढीचा आणि खासकरून पुण्याचा आहे हे जाणवतं. पात्रांच्या हालचालीतला सफाईदारपणा आणि नाटकातील नेपथ्याचा वापर उल्लेखनीय तसेच दिग्दर्शकाची मेहनत आणि त्यांच्या कसून झालेल्या तालमी यांची चुणूक दाखविणारा आहे. इतक्या अवघड मूव्हमेंट्स करत योग्य तो समन्वय साधणं खूप कठीण आहे हे जाणवतं आणि त्याबद्दल हॅट्स ऑफ! सखी गोखले आणि सुव्रत जोशी ही जोडी रंगमंचावर जो काही अवर्णनीय गोंधळ घालते त्याला तोड नाही. त्यांच्यामधली केमिस्ट्री आधी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून आणि नंतर ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकातून आपण अनुभवली आहेच. आता खऱया आयुष्यातील लग्नानंतर ते पुन्हा एकदा रंगमंचावर एकमेकांना परिपूर्ण साथ देतात. त्यांच्या त्या जबरदस्त Give and Take मुळे नाटकाला एक वेगळा फ्लेव्हर येतो. त्यांच्या सोबतीला सुरज पारसनीस त्याला नेमून दिलेलं काम इमानेइतबारे पार पाडतो. ही भूमिका लेखनात अजून भरीव करायला हवी होती असं वाटत राहतं.

नाटकातली दोन गाणी प्रसंगानुरूप छान उतरली आहेत. फुलवा खामकरची कोरिओग्राफीही एकदम बेस्ट. नाटकातील नेपथ्याला आणि वेशभूषेला दिलेला निळ्या रंगाचा इफेक्ट लक्षवेधी आहे. या वेगळ्या प्रयत्नाबद्दल संपूर्ण टीमचेच कौतुक करायला हवे. एकंदरीत नाटकांची आवड असणाऱया प्रत्येकानेच आवर्जून पाहावं असं हे नाटक आहे. यातला विनोद ताजा आणि निर्विष आहे. प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा कुठलाही आव न आणता, स्वतचीच खिल्ली उडवत सद्यस्थितीचं दर्शन घडविणारी आणि तुम्हीच काय ते ठरवा असं स्वातंत्र्य देणारी ही एक कॉमेडी आहे, पण त्यासोबतच रिलेशनशिपकडे सजगपणे पाहायला लावणारी ही एक तुमची-आमची गोष्ट आहे. आपण त्या वयाचे असू नसू, पण कधीतरी त्यातून गेलोय किंवा जाणार आहोत याचं भान देणारी आणि खुदकन हसवणारी ही एक राइड आहे.

थोडक्यात हा एक स्वच्छ आरसा आहे, ज्यात आपल्या प्रत्येकालाच आपल्या मनाची प्रतिबिंबं दिसतात. आपण हसत हसत आपल्याच आत डोकावून बघतो आणि त्या नाटकातल्या पात्रांमधलं काही आपल्याला तिथे दिसतं, जाणवतं आणि म्हणून हे नाटक आपल्याला आवडून जातं.

[email protected]