
ईदनिमित्त घराची साफसफाई करत असताना कुलरचा शॉक लागून सख्या जावांचा मृत्यू झाल्याची घटना परभणीत घडली. बिस्मिलाबी इस्माईल शेख आणि शेख जहुराबी शेख युसुफ अशी मयत महिलांची नावे आहेत. पूर्णा तालुक्यातील गौर येथे ही हृदयद्रावक घटना घडली.
ईदचा सण जवळ आला असल्याने शेख कुटुंबातील जाऊबाई बुधवारी दुपारी आपापल्या घराची साफसफाई करत होत्या. सफाई करताना शेख जहूराबी यांचा ओला हात कुलरला लागला. यामुळे त्यांना शॉक बसला. जाऊ कुलरला चिकटली बघून त्यांना वाचवायला बिस्मिलाबी या वाचवायला आल्या.
बिस्मिलाबी यांनी जहूराबी यांचा हात धरुन त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना देखील शॉक लागला. यात दोघी जावांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.