संस्थाचालकाच्या छळामुळे परभणीत शिक्षकाची आत्महत्या

बीडमध्ये संस्थाचालकाच्या छळाला कंटाळून शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच परभणी जिल्ह्यातील नृसिंह प्राथमिक शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकाने संस्थाचालकाच्या भ्रष्टाचारामुळे आत्महत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. संस्थाचालकाने नियुक्तीसाठी 20 लाख, तर पगार काढण्यासाठी 5 लाख रुपये घेतल्याचे सोपान पालवे या शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी सोपान पालवे यांनी तीनपानी चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात त्यांनी मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे संस्थेच्या विरोधात लढण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. आत्महत्या हाच पर्याय असून संस्था सचिव बळवंत खळीकर हेच माझ्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी सागर पालवे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.