पनवेल शहर आणि परिसरात वाहनांची वर्दळ नसलेल्या रस्त्यांवर नो पार्किंगचे बोर्ड लावून वाहतूक पोलिसांनी वाहनांना वसुलीचे ‘टोचन’ लावले आहे. नवीन पनवेल ते माथेरान रोड वाहतूक पोलिसांच्या ‘कमाई’चा राजमार्ग बनला आहे. या मार्गावर विविध बँकांच्या सुमारे १५ शाखा आहेत. विविध खासगी कार्यालयेही आहेत. त्या ठिकाणी जाणारे नागरिक आपले वाहन घाईगडबडीत बाहेर रस्त्यावर पार्क करतात. या वाहनांना वाहतूक पोलिसांकडून वेळेचा विलंब न करता ‘टोचन’ लावले जात आहे. या छळवणुकीमुळे सर्वसामान्य वाहनचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पनवेल शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाने नो पार्किंगचे बोर्ड लावले आहेत. हे नो पार्किंगचे बोर्ड सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठे डोकेदुखी आणि वाहतूक पोलिसांसाठी कमाईचे मोठे साधन बनले आहेत. एचडीएफसी सर्कल ते नवीन पनवेल पोलीस चौकी या दरम्यान विविध बँकांच्या सुमारे 15 शाखा आहेत. याच भागात अनेक खासगी कार्यालयेदेखील आहेत, परंतु येथे येणाऱ्या ग्राहकाला पार्किंग करायची मात्र सोय नाही. तसा हा रस्ता प्रशस्त आहे. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला फक्त सिंगल लाईन लावून वाहने व्यवस्थित पार केली तर वाहतुकीला कोणताही अडसर या ठिकाणी होत नाही, परंतु असे असतानादेखील वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले आहेत. त्यामुळे येथील बँकांमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना नाहक भुर्दंड पडत आहे. नेमका सर्वसामान्य माणसाच्या या मजबुरीचा फायदा घेऊन वाहतूक पोलिसांकडून ‘टोचन’चा धंदा जोमाने चालविला जात आहे.
सम-विषम तारखा
माथेरान मार्गावर अनेक ठिकाणी नो पार्किंगच्या फलकांवर सम-विषम तारखा लिहिल्या आहेत. या तारखांमध्ये अनेक वाहनचालकांचा गोंधळ उडतो आणि त्याला विनाकारण दंड भरावा लागत आहे. वाहनधारकांनी जर सिंगल लाईन सोडून डबल लाईन लावून गाडी पार्क केली असेल तर त्यावर आवश्यक कारवाई करा, पण विनाकारण वाहतुकीला अडथळा होत नसतानाही उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई पोलिसांच्या टोचन व्हॅनने दुचाकी उचलून नेल्यानंतर तिचा शोध घेताना दुचाकीस्वारांच्या नाकीनऊ येते. ही छळवणूक थांबवण्यासाठी विनाकारण कारवाई करू नका, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.