पालिका रुग्णालय हाऊसफुल्ल पनवेलकरांचा घसा धरला हवामान बदलामुळे ताप, सर्दी, खोकला, खवखव

बदलत्या हवामानामुळे पनवेलमध्ये साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. प्रदूषणामुळे पनवेलकरांचा घसा खोकल्याने धरला आहे. थंडी, ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून पालिकेचे रुग्णालय अक्षरशः हाऊसफुल्ल झाले आहे. विशेष म्हणजे यात लहान मुलांचा अधिक समावेश असल्याने साथ आटोक्यात आणण्याकरिता आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन तपासणी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

थंडीची चाहूल लागताच ताप, सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढल्याने सरकारी रुग्णालयाला जत्रेचे स्वरूप आले आहे. थंडी, हवेत वाढलेले धुळीचे कण आदी कारणांमुळे पनवेलची हवा प्रदूषित झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. हवेत विषारी घटक वाढल्यामुळे श्वसनाचे विकार आणि घशाचा त्रास वाढला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात पालिका दवाखान्यांची संख्या 26 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी खोकल्याचे 15 हजार ५५० रुग्ण आणि तापाचे 21 हजार 819 रुग्ण असे एकूण 37 हजार 369 रुग्णांची नोंद करण्यात आली. मात्र आता 11 महिन्यांतच ही संख्या दुपटीने वाढली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या महिन्यात ताप आणि खोकल्याचे एकूण 26 हजार 84 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

दवाखाने पूर्ण वेळ सुरू

ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. पालिकेचे 26 दवाखाने सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असतात. रुग्णांनी प्रवासावेळी मुखपट्टी लावावी. प्रत्येक वसाहतीमध्ये तसेच ग्रामीण भागात पालिकेचे दवाखाने असून या दवाखान्यांमध्ये दोन शिफ्टमध्ये डॉक्टर व आरोग्यसेविका काम करतात असे पनवेल पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सांगितले.