इथे होतो बंदुकीचा मेकओव्हर, पनवेलमध्ये चार पिढ्यांपासून दुरुस्तीचे दुकान

मोबाईल, टीव्ही, संगणक, मिक्सर, इलेक्ट्रीकल उपकरणे दुरुस्तीची दुकाने तुम्हाला आसपास सर्वत्रच पाहायला मिळतात. मात्र तुम्ही जर पनवेल येथे गेलात तर तिथे चक्क अधिकृत परवानाधारक बंदूक दुरुस्तीचे दुकान आहे. मंदार मने यांचे कुटुंब गेल्या चार पिढ्यांपासून हा व्यवसाय करीत आहेत. बंदूक दुरुस्तीचे काम अत्यंत जोखमीचे असून ते फार काळजीपूर्वक करावे लागते. आतापर्यंत मने कुटुंबीयांनी देशी-विदेशी शस्त्रांची दुरुस्ती केली आहे.

मंदार मने यांचे पणजोबा नानाभाऊ मने यांनी 1924 मध्ये उरण तालुक्यातील जासई येथे बंदूक दुरुस्तीचे काम सुरू केले होते. जातीने लोहार असल्याने शस्त्राचे काम करणे हा व्यवसाय त्यांनी करायचं ठरवलं म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना शस्त्र दुरुस्तीचा अधिकृत परवाना दिला होता. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर मने यांचे आजोबा पांडुरंग मने यांनी शस्त्र दुरुस्तीचे काम जासईनंतर पनवेलमध्ये 1954 पासून सुरू केला. हीच बंदूक दुरुस्तीची परंपरा मंदार यांचे वडील रमाकांत मने यांनी सुरू ठेवली. आता मंदार मने हेही आपल्या कुटुंबाने चार पिढ्यांपासून सुरू ठेवलेला वारसा पुढे नेत आहेत. त्यांनी बंदूक दुरुस्तीमध्ये स्वतःला झोकून दिले आहे.

रायगड, ठाणे जिल्ह्यात एकमेव ठिकाण
मने यांच्या दुकानात रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील तसेच नवी मुंबई व मुंबई येथून शस्त्रे दुरुस्तीसाठी येतात. त्यामध्ये प्रामुख्याने शेती संरक्षणासाठी असलेल्या रायफल, बँकांच्या सुरक्षारक्षकांकडे असलेल्या रायफल, स्वसंरक्षणासाठी असलेले रिव्हॉल्व्हर, पिस्तूल यांचा समावेश आहे. ही शस्त्र दुरुस्ती करताना फार काळजी घ्यावी लागते. सुरुवातीला शस्त्राचा परवाना काळजीपूर्वक पाहावा लागतो.

चार पिढ्यांत एकही अपघात घडला नाही
घडले आहेत. मात्र मने यांच्या चार पिढ्यांमध्ये शस्त्र दुरुस्ती करताना अद्याप एकही अपघात घडलेला नाही. दुरुस्तीसाठी येणारे शस्त्र फार काळजीपूर्वक हाताळावे लागते. मने यांच्या दुकानात देशी आणि विदेशी शस्त्रांची दुरुस्ती केली जात आहे. रायफलची लाकडी बट तयार करण्यासाठी मने यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून ग्राहक येत असतात.