
नवीन पनवेलच्या सेक्टर 16 मध्ये पिल्लई कॉलेजजवळ महानगर गॅस कंपनीच्या सुरू असलेल्या खोदकामामुळे महावितरणची भूमिगत केबल तुटली. त्यामुळे पनवेलमध्ये तब्ब्ल 18 तास बत्ती गुल झाली होती, तर महाड एमआयडीसीमध्ये मुख्य रस्त्यालगतही कंत्राटदाराने नियम धाब्यावर बसवून खोदकाम केल्याने वीजवाहिनी तुटून महाड तालुक्यातील वीजपुरवठा 15 तास खंडित झाला होता. त्यामुळे एसी, पंखा, कुलर बंद राहिल्याने नागरिकांचा चांगलाच घामटा निघाला.
नवीन पनवेलमधील सेक्टर 15, 15 ए आणि 16 मधील नागरिकांना याचा फटका बसला. वाढत्या तापमानामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना वीज खंडित झाल्यामुळे अधिकच मनस्ताप सहन करावा लागला. तापमान 38 अंशांपेक्षा अधिक असताना पंखे, एसी बंद पडल्याने सर्वांचा अक्षरशः घामटा निघाला. महानगर गॅस कंपनीकडून शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र या कामामध्ये सुरक्षेचे आणि समन्वय नसल्याने वारंवार विजेच्या लाइन तुटत आहेत.
तज्ज्ञ पथके बोलावूनही हाती निराशा
महाड औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यालगत सुरू असलेल्या उत्खननादरम्यान भूमिगत वीजवाहिन्यांची हानी झाली होती. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होताच महावितरणने पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, पण या काळात विजेची मागणी वाढती असल्याने एकामागोमाग एक फॉल्ट निर्माण होऊन पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास शहरासह संपूर्ण तालुक्यात वीजपुरवठ्याने मान टाकली. पनवेल आणि पुणे येथील तज्ज्ञ पथके बोलावूनदेखील सायंकाळी उशिरापर्यंत हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले नव्हते.