पंतच श्रीमंत, आयसीसी कसोटी क्रमवारीत थेट टॉप टेनमध्ये एण्ट्री

चेन्नई कसोटीतील खराब कामगिरीमुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या हिंदुस्थानच्या स्टार फलंदाजांची आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी घसरण झालीय. मात्र तब्बल 632 दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा ऋषभ पंत क्रमवारीत श्रीमंत ठरला आहे. आपल्या धडाकेबाज शतकी कामगिरीच्या जोरावर त्याने अव्वल दहा फलंदाजांमध्ये झेप घेतलीय. दुसरा शतकवीर शुबमन गिललाही फायदा झाला आहे.

आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 899 रेटिंग गुण आहेत. केन विल्यमसन (852) दुसऱ्या, डॅरिल मिशेल (760) तिसऱ्या, आणि स्टीव्ह स्मिथ (757) चौथ्या स्थानावर आहेत. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात बांगलादेशविरुद्ध 56 धावांची खेळी करणाऱ्या जैसवालला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. क्रमवारीत तो हिंदुस्थानचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरलाय.

बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत शतक झळकावणाऱ्या ऋषभ पंतने सहाव्या क्रमांकावर झेप घेतलीय. त्याच्या खात्यात 731 रेटिंग गुण आहेत. कसोटी क्रमवारीत जैस्वालनंतर तो हिंदुस्थानचा दुसरा अव्वल फलंदाज होय. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजा सातव्या स्थानावर, तर पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान सातव्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेनही संयुक्त आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

रोहित, कोहलीची घसरण

चेन्नई कसोटीत अपयशी ठरलेला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची ताज्या फलंदाजी क्रमवारीत पाचव्या स्थानावरून थेट दहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीला चेन्नई कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून केवळ 23 धावा करता आल्या. त्यामुळे तो सातव्या स्थानावरून थेट 12व्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा बाबर आझम 11व्या स्थानावर आहे.