निवडून आले असते तर हिरो झाले असते, पण ते कुणाला कसं आवडेल? पंकजा मुंडे यांचा रोख कुणाकडे

लोकसभा निवडणूकीत बीड मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनावणे 7 हजार मतांनी विजयी झाले आहेत. पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे बीड जिह्यात आत्महत्येचे सत्र सुरू झाले. मुंडेंच्या दोन समर्थकांनी आत्महत्या केल्या आहेत. दरम्यान त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी एक वेगळेच वक्तव्य केले असून त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. “मी जर निवडून आले असते तर हिरो झाले असते, पण मी हिरो होणार हे कुणाला कसं आवडेल”, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून पंकजा मुंडे यांचा रोख नक्की कुणाकडे आहे अशी चर्चा सुरू झाली आङे.

”मी हरले म्हणजे संपले का? या देशात पहिल्या पाच मध्ये मतं पडली आहेत मला कदाचित पहिल्या तिघातही असेन. तब्बल 6 लाख 77 हजार मतं मिळाली. तीन हजार मतं मिळाली असते तर जिंकून आले असते. पण निवडून आले असते तर हिरो झाले असते आणि मी हिरो झाले असते तर कुणाला कसं आवडलं असतं? असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही संकेत दिले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हणाल्या की ” आपल्याला इथे थांबायचे नाही. विधानसभा तोंडावर आल्या आहेत. आधी आपल्याला पाच वर्ष वाट पाहावी लागली. आता फक्त दोनच महिने वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे जोमाने कामाला लागले पाहिजे. फक्त इशाऱ्यांकडे लक्ष द्या’, असे त्या म्हणाल्या.