
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडे बहीण-भावाविरोधात रान उठवले होते. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता पंकजा मुंडे यांनीही उत्तर दिले असून सुरेश धस यांची थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे दिसून येते.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट का घेतली नाही? असा सवाल वारंवार सुरेश धस उपस्थित करत होते. तसेच निवडणुकीचा प्रचार केला नाही, असा आरोपही धस यांनी केला होता. याला आता पंकजा मुंडे यांनी एका मुलाखतीत उत्तर दिले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर 12 डिसेंबरला मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघाले होते. वाटेत असतानाच कार्यकर्त्यांनी धनंजय देशमुख यांना फोन लावला. त्यावेळी त्यांनी भावाला न्याय द्या अशी मागणी केली. तसेच तुम्ही आलात आणि तुमच्याशी कुणी गैरवर्तन केले तर आम्हाला आवडणार नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे मी माघारी फिरले, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावरही हल्ला चढवला. सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरतात, मग धनंजय मुंडे यांची भेट गुपचूप का घेतली? असा सवाल त्यांनी सुरेश धस यांनी केला. तसेच गेल्या तीन वर्षापासून राज्यात महायुतीचे सरकार असून धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री, तर सुरेश धस आमदार होते. त्यावेळी वाल्मीक कराड काम करत होता. तेव्हा धस यांनी त्याच्याविषयी नेत्यांकडे तक्रार का केली नाही? असा सवालही पंकजा मुंडे यांनी केला.
बीडच्या प्रकरणाशी माझा आणि माझ्या पक्षाचा संबंध नसतानाही सुरेश धस यांनी हे प्रकरण एवढे का पेटवले? मी भाजपची राष्ट्रीय नेता असून त्यांनी माझ्यावर थेट आरोप केले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना समज द्यावी, असेही पंकजा म्हणाल्या.