बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट

आंबेगाव तालुक्यातील बिबट्या प्रादुर्भाव हॉटस्पॉट बनलेल्या लौकी येथे सोमवारी (ता.23) रात्री नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून तत्काळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. कळंब, लौकी व चांडोली बुद्रूक या तीन गावांच्या सीमेवर असलेल्या वाडीवस्त्यांवर बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे.

गेल्या आठ दिवसांत लौकी येथे सातजणांवर बिबट्याने हल्ला केला आहे. लौकी येथून जात असताना, गौरव रमेश थोरात, नीलेश शंकर थोरात, रुपेश विजय थोरात, ऋषिकेश मंगेश थोरात, शशिकांत तुकाराम थोरात यांना सोमवारी (ता.२३) रात्री बिबट मादी आणि बछडा दिसला. मेंढपाळ नामदेव सूळ यांच्या मेंढीचाही बिबट्याने फडशा पडला आहे. त्यामुळे वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक संपत तांदळे, जालिंदर थोरात, एकनाथ ढोंगे यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी राणूबाई मंदिर परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक राजाराम बाणखेले यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे.