आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने 15 लाखांहून अधिक वारकरी तसेच भाविकांनी पंढपूरमध्ये हजेरी लावली होती. त्यातच पावसाची सुद्धा रिपरिप सुरू होती. भाविकांनी उघड्यावर खरकटे अन्न व इतर घाण केल्याने पंढरपूरातील बऱ्याच भागांमध्ये दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करत शहर आणि उपनगर चकाचक केले आहे.
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या सोहळ्यासाठी आलेल्या 15 लाखांहून अधिक वारकरी आणि भाविकांना मुलभूत सेवा सुविधा पुरवण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश होते. तसेच पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी यासाठी विशेष यंत्रणा राबवली. गर्दी कमी होताच एकादशीच्या रात्रीपासूनच 24 तास स्वच्छता मोहिम व कचरा गोळा करण्याचे काम चालू करण्यात आले. नदीपात्र वाळवंट, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपूर मंदिर परिसर, शहर उपनगर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी 1500 स्वच्छता कर्मचारी काम करत आहेत. भाविकांनी उघड्यावर खरकटे अन्न फेकल्यामुळे व इतर घाण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. त्यातच पाऊस पडत असल्यामुळे पावसाचे पाणी साठून डासांचे प्रमाण वाढले. त्यामुळे स्वच्छता करताना जंतुनाशक फवारणी सुद्धा करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मलेरिया विभागाकडून 50 कर्मचारी, घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत 45 घंटागाडी, आरोग्या विभागाकडील 6 टीपर, 3 कॉम्पॅक्टर, 6 डंपिंग ट्रॉली व जेसीबीच्या सहाय्याने 1500 कर्मचाऱ्यांनी पंढपूर चकाचक करण्यात खारीचा वाटा उचलला. तसेच स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. तसेच आपल्या फ्रीजची आणि टेरेसची तपासणी करून डेंग्यू डासाची उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी केले आहे.