
‘गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला’, या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱयांच्या गजराने दुमदुमून गेली. ‘ज्ञानेश्वर, माउली, तुकारामांच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या. मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरू केला.
पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे 5 वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर भजन झाले, तर शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे 4 वाजता गोपाळपुरात आगमन झाले. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा विविध सुमारे 400 संतांच्या दिंडय़ा, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या.
सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची, तर 9.30 च्या सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले. श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या. या पालख्यांसह संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तिनाथ महाराज, संत निळोबाराय, चांगावटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे व दिडय़ांचे गोपाळपुरात आगमन झाले.
संत–देव भेटीचा सोहळा
n गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दाखल झाल्या व सर्व संतांच्या पादुका श्री विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या. यावेळी देवाची आणि संतांची अनुपम भेट घडवून आणण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यावर हा संतदेव भेटीचा सोहळा पार पडला. यानंतर पालख्या परतीच्या मार्गावर रवाना झाल्या.