पिराची कुरोली पालखी तळावर 24500 स्क्वेअर फुटांचा वॉटरप्रुफ मंडप

आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंढरपूर तालुक्यात 14 जुलैला प्रमुख पालख्यांचा प्रवेश होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूर तालुक्यातील पहिले मुक्कामाचे ठिकाण असलेले पिराची कुरोली येथील पालखी तळावर पावसाची शक्यता लक्षात घेता पालख्यांच्या निवासासाठी तब्बल 24 हजार 500 स्क्वेअर फुटांचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहे. शिवाय पालखीतळावर भाविकांच्या सोयीसाठी आपत्ती व्यवस्थापन, हिरकणी कक्ष, सुसज्ज शौचालय, स्वच्छता, वीजपुरवठा, पाणीपुरवठा आदी कामे युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर गिड्डे यांनी दिली. ही सर्व कामे 12 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला.

पंढरपूर तालुक्यात 14 जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम पिराची कुरोली येथे, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मुक्काम भंडी शेगाव येथे असतो. त्यानुसार दोन्ही प्रमुख पालख्यांमधील भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक ग्रामपंचायतीकडून युद्ध पातळीवर मोहिम राबविली जात आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून ग्रामपंचायतीला 12 लाख रुपयांचा निधीही देण्यात येतो. याच निधीमधून पालखी तळावर 2 लाख लिटर क्षमतेच्या तीन पाण्याच्या टाक्या, 55 स्टॅण्ड पोस्ट असलेले नळ कनेक्शन, 11 ठिकाणी हायमास्ट दिवे, याशिवाय संपूर्ण पालखी तळावर विजेची सोय करण्यात आली आहे.

पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र 100 स्नानगृहे, 15 शॉवर स्टॅण्डपोस्ट काढण्यात आली आहेत. पालखीतळावर तात्पुरती 1200, कायमस्वरूपी 67 व अन्य ठिकाणी अशा 1500 शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सभा मंडप, भोजन मंडप, कमानी, वॉल कंपाऊंड, पालखी चौथऱयाला रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाऊस पडल्यास चिखल होऊ नये म्हणून संपूर्ण पालखीतळावर गवत काढून मुरुमीकरण करण्यात येत आहे. पालखीतळावरील रस्त्यांचे मुरुमीकरण करून मजबुतीकरण केले जात आहे. दिंडय़ांसोबतच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी तीन ठिकाणी फिडिंग पॉइंट काढण्यात आले आहेत.

प्रमुख पालखी मार्गासह पालखीतळावर चार ठिकाणी माउली मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. याशिवाय 10 ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्र, 10 ठिकाणी कचराकुंडय़ा, महिलांसाठी तीन ठिकाणी चेंजिंग रूम उभारण्यात येत आहेत.

आरोग्य यंत्रणा सज्ज

z संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत येणाऱया दिंडय़ा, भाविकांची संख्या लक्षात घेता आरोग्य विभाग सतर्क असून, पिराची कुरोली पालखीतळावर पालख्या येण्याअगोदर पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. याशिवाय पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी पावडरचा वापर करण्यात येत आहे. शिवाय पालखीतळावर टीसीएल पावडरची फवारणी करून संसर्गजन्य रोगांचा प्रसार होणार नाही, याची खबरदारी आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. शिवाय मोफत औषध पुरवठा, तात्पुरती औषधोपचार केंद्रे उभारून भाविकांची काळजी घेण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.