जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळाअंतर्गत माळीनगर येथे नेत्रदीपक असा उभा रिंगण सोहळा रंगला. या सोहळयातील हे पहिले उभे रिंगण होते. वैष्णवांच्या हरिनामाच्या गजर करीत माळीनगरच्या वेशीवर स्टार रेसिडेन्सीच्या समोरील रस्त्यावर रंगलेल्या या सोहळ्याने आसमंत ही भक्तीरसात चिंब झाला.
अकलूजकरांचे दिवसभरातील आदरतिथ्याचा भावपूर्ण निरोप घेऊन संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास माळीनगर वेशीवर प्रवेश केला. वेशीवर माळीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुपमा एकतपूरे, ग्रामपंचायत सदस्य, व पदाधिकारी यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. तर दी. सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या वतीने पूर्ण वेळ संचालक परेश राऊत, जनसंपर्क अधिकारी अनिल बनकर, सचिन कुदळे, आणि खाते प्रमुखांनी स्वागत केले. शुगरकेन सोसायटीच्या वतीने संस्थेचे चेअरमन अमोल ताम्हाणे, व्हाइस चेअरमन कपिल भोंगळे, संचालक नामदेव आगम, माजी संचालक सुबोध गिरमे, संस्थेचे मॅनेजर अनिल गिरमे आणि पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पार पाडण्यासाठी वैष्णव बांधव, वैष्णव भगिनी आणि माळीनगर मधील भाविक रस्त्याच्या दुतर्फा सज्ज झाले. दरम्यान रस्त्याच्यामध्ये महिलांनी फुगड्या खेळल्या. अश्वांच्या धावण्याच्या वेळी भाविकांनी हरिनामाचा जयघोष केला. विणेकरी, टाळकरी यांनी रिंगणात वेगळाच भक्ती रंग भरला.
मानाच्या अश्वाने धावा पूर्ण केल्यानंतर पुन्हा हरिनामाचा गजर करत उभे रिंगण संपले. नंतर मॉडेल हायस्कूलच्या प्रांगणात असलेल्या ओपन इयर थेटर मध्ये विसवण्यासाठी पालखी सोहळा मार्गस्थ झाला. तेथे पालखीच्या पादुकांची मंत्राच्या जयघोषात यथोचित पूजा कारखान्याचे सभासद व एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रकाश गिरमे व सौ रेखा प्रकाश गिरमे या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. पूजेनंतर आरती होऊन पालखी दर्शनासाठी खुली करण्यात आली.
कारखान्याने महिला व पुरुषांसाठी यंदा वेगळीच दर्शन रांगेची सोय केल्याने शांततेत सर्वांना व्यवस्थित दर्शन घेता येत होते. यावेळी कारखान्याचे वॉचमन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वारकऱ्यांसाठी माळीनगर साखर कारखान्याने सुमारे 5000 वारकऱ्यांची सालाबाद प्रमाणे मिष्टान्न जेवणाची सोय गुलमोहर इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात केलेली होती. दुपारी बाराच्या सुमारास पालखीने बोरगाव येथील नवीन पालखीतळावर च्या मुक्कामासाठी प्रस्थान ठेवले. माळीनगर सोडल्यानंतर पुढे गट नंबर दोन येथे माढा मतदारसंघाच्या वेशीवर सालाबादप्रमाणे बबनदादा शिंदे परिवाराने पालखी सोहळ्याचे स्वागत केले.