
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱया घटनांचा क्रम सुरू आहे. पंढरपुरातील तोफकट्टी संस्थान मठाच्या 64 वर्षीय स्वामींना लोखंडी गजाने अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. मठाचा ताबा घेण्यावरून ही मारहाण झाल्याचे वृत्त असून, याप्रकरणी सहाजणांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मठाचा मीच पुजारी आणि मालक, तू बाहेरून आलायस. तुझा इथे काही संबंध नाही, असे म्हणून राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी (वय 64, रा. सिद्धनकेरी) यांना लोखंडी गजाने पाठीवर, खांद्यावर, पायांवर मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी राजू लिंगप्पा कोरे, संतोष रामचंद्र कोरे, सिद्धू येसाप्पा कोरे, मंजुनाथ सकलेश कोरे, भीमू सिद्धप्पा कोरे, प्रमोद रेवाप्पा कोरे या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी फिर्यादीने आरोपींना प्रकरण कोर्टात सुरू आहे, असे सांगत त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला.