गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्षाप्रारंभ निमित्त आज (रविवार) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या मुळे श्रींचा गाभारा मनमोहक दिसत आहे. सजावटीसाठी शेवंती 200 किलो, अष्टर 80 किलो, गोंडा 150 किलो, गुलाब 100 गड्डी, जिप्सी 10 गड्डी या फुलांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

सदरची सजावट विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील रा. रांजणगाव महागणपती यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली असून, सजावटीचे काम श्री फ्लॉवर्स, पुणे यांनी केले आहे. यासाठी सुमारे 12 कामगारांनी परिश्रम घेतले.

हिंदू नववर्षा निमित्त भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, भाविकांची गर्दी विचारात घेऊन भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने ऑनलाइन दर्शन पास बुकिंग व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. तसेच व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, पुजेची संख्या कमी करणे व इतर अनुषंगिक उपाययोजना करण्यात समिती मार्फत करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक वर्षी महत्त्वाचे सण उत्सव, खास दिवस या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास, सजावट केली जाते. हिंदू नवीवर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजले असून, मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याने, विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत आहे. हिंदू नव वर्षाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने व्हावी यासाठी हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपूरात दाखल झालेले आहेत. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन रांगेत गर्दी केली असून, विठ्ठल रुक्मिणीमातेच्या नाम गजराने परिसर दुमदुमून गेला आहे. या सजावटीमुळे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुर्तीसह गाभारा पाहून देखील भाविक अधिक समाधानी होत आहे.