
>> सुनील उंबरे
वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असून, चाळीशी पार पोहोचला आहे. त्यामुळे नागरिक बाजारात पंखा, कुलर, एसी यांसारखी उपकरणे घेऊन उन्हाची दाहकता कमी करण्याचा उपाय करीत आहेत. असाच एक वेगळा उपाय वैद्य असलेले रामहरी कदम यांनी केला आहे. त्यांनी चक्क आपल्या नव्या कारला शेण आणि गोमूत्र एकत्र करून लेप दिला आहे. यामुळे कडक उन्हातदेखील गाडीच्या आतील तापमान निम्म्प्यावर येते आणि गाडीचा लुकदेखील चांगला राहतो, असा दावा डॉ. कदम यांनी केला आहे. सध्या वैद्य कदम यांच्या कारची चांगलीच चर्चा होत आहे.
पंढरपूर येथील आयुर्वेदिक डॉ. राम हरी कदम यांनी वाढत्या उन्हापासून बचाव करण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे. दवाखान्याबाहेर ते आपली कार लावतात. मात्र, सध्या उन्हाचा पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. त्यामुळे गाडीतील एसी सुरू केला, तरी सुरुवातीला गरम हवा येते. यावर डॉ. कदम यांनी देशी
आणि पूर्वी खेडोपाडी वापरत असलेला उपाय करण्याचे ठरवले.
देशी गाईचे शेण आणि गोमुत्र एकत्र केले आणि कारला बाहेरून लेप लावला. कारची पुढची आणि मागची काच, आरसे, चाक सोडून गाडीच्या बाह्यभागाला हा लेप लावला आहे. ‘गोबर वसते लक्ष्मी गोमुत्र संजीवनी’ याप्रमाणे देशी गाईचे आणि गोमुत्राचे महत्त्व कळावे, हाही त्यामागील एक उद्देश असल्याचे डॉ. कदम सांगतात.
दुचाकी अन् घराच्या भिंतीलाही लेप
यापूर्वी डॉ. राम कदम यांनी आपल्या दुचाकी वाहनाला असा लेप लावला होता. तसेच घराच्या सिंमेट भिंतीलादेखील हा लेप लावला आहे. वास्तविक पाहता अनेकांना व्हिंटेज, महागड्या गाड्यांची अनेकांना हौस असते. मात्र, देशी गाईचे गोबर आणि गोमुत्राचा प्रसार आणि महत्त्व सांगणाऱ्या या अवलियाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“लेप लावण्यासाठी 50 किलो गाईचे शेण आणि 25 लिटर गोमूत्र असे ठेवले. या लेपनामुळे उन्हात तापमान कमी होते. कारवर घाण, धूळ जास्त बसत नाही. गोबर म्हणजे शेण बुरशीजन्य, विषाणूजन्य रोग रोखण्याचे काम करते. तसेच रेडीएशन रोखले जाते. विशेष म्हणजे हा लेप मोठा पाऊस पडला नाही तर पाच महिने टिकू शकतो. शिवाय या लेपामुळे गाडीच्या रंगाला कोणताही परिणाम होत नाही.
– डॉ. राम कदम