
>> सुनिल उंबरे
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये शंभरहून अधिक भाविकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पंढरपूरमधील प्रशासकीय यंत्रणेने डोळ्यात तेल घालून काम करण्याची गरज आहे.
येत्या 17 जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी वारीचा सोहळा आहे. या सोहळ्याला महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून लाखो भाविकांची उपस्थिती असते. आषाढी एकादशीच्या पर्वणीवर वारकरी भाविक भल्या पहाटेपासून चंद्रभागा नदीच्या स्नानासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. पहाटे 2 ते सकाळी 10 वाजेपर्यंत चंद्रभागा वाळवंट, चंद्रभागेचे घाट, श्री विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग आदी भागात भाविकांची प्रचंड गर्दी असते.
या गर्दीला आवर घालण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांची मोठी फौज इथे काम करीत असते. तथापि भाविकांची संख्या अन् उपलब्ध असलेले अरुंद रस्ते यातून या गर्दीवर नियंत्रण करणे जीवाची बाजी लावल्यासारखे आहे. खास करुन महाद्वार घाट इथे स्नानासाठी जाणाऱ्या आणि स्नान करुन बाहेर पडणाऱ्या भाविकांची वर्दळ एवढी असते की या गर्दीतून वाट काढताना श्वास गुदमरतो. याठिकाणी पोलीस यंत्रणेला अक्षरशः डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. जरा जरी दुर्लक्ष झाले की गर्दीतील लोक बेभान होऊन पळत सुटतात. या धावपळीत वयोवृध्द भाविक आणि लहान मुलं चेंगरली जातात.
अशीच काहीशी परिस्थिती महाद्वार चौक, संत नामदेव पायरी, कालिकादेवी चौक, चौफाळा आणि नाथचौक या ठिकाणी असते. प्रमुख संतांच्या पालख्या प्रदक्षिणा घेण्यासाठी बाहेर पडल्या की प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची मुंग्यांप्रमाणे दाटीवाटीने रांग लागते. प्रदक्षिणा घेणाऱ्या भाविकांची गर्दी आणि गर्दीतून वाट काढत नदीकडे जाणाऱ्या भाविकांची लगबग चौकाचौकात माणसांचे भवरे निर्माण करते.
या तोबा गर्दीवर नियंत्रण घालण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून उपाययोजना केल्या जातात. प्रसंगी आपत्कालीन व्यवस्थापनाचे मार्गदर्शन घेतले जाते. मात्र विठ्ठल नामस्मरणात मंत्रमुग्ध झालेल्या भाविकांवर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत करणे हे काम अतिशय जोखमीचे आणि तितकेच भावनिकसुद्धा आहे.
भाविकांच्या परंपरा, श्रद्धा, मानसन्मान जपत मोठ्या कौशल्याने हा सोहळा पार पाडावा लागतो. या सोहळ्यात पूर्वी एका हत्तीने गोंधळ घातल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत 10 हून अधिक भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हा पासून हत्तीला गर्दीतून नेण्यास बंदी घालण्यात आली. मात्र घोडा, बैल या सारख्या प्राण्यांचा वावर असतो. त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालखीप्रमुखांनी विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
वारीच्या कालावधीत चंद्रभागेच्या पात्रामध्ये वारकरी भाविक मोठ्या श्रध्देने नौकाविहार करीत असतात. मात्र या होड्या सक्षम आहेत का? त्यामधून किती भाविकांना प्रवास करणे सुरक्षित आहे? पाण्यात दुर्घटना घडली तर भाविकांच्या जीवाचे रक्षण होण्यासाठी लाईफ जॅकेट आहेत का? याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. याशिवाय जीवितहानी होण्याचे तिसरे ठिकाण म्हणजे शहरातील मोडकळीस आलेले मठ, धर्मशाळा, खासगी वाडे, भक्त निवास आदी ठिकाणी भाविकांना राहण्यास निर्बंध घालणे गरजेचे आहे.
धोकादायक वास्तूंमध्ये भाविकांनी राहू नये, यासाठी पंढरपूर नगरपरिषदेकडून सूचना दिल्या जातात. संबधित जागा मालकांना नोटीसही काढली जाते. मात्र याकडे दुर्लक्ष करुन जागामालक धोकादायक जागेमध्ये भाविकांना राहण्याची सोय करतात. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्या तर या धोकादायक इमारतीमधील भाविकांच्या जीविताला धोका होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण राबविणे आवश्यक आहे. आजवर येथे मोठी दुर्घटना घडली नाही, पण या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. या प्रश्नांबाबत जिल्हा प्रशासनाने वेळीच सावध पावले उचलायला हवीत.