मतांसाठी बनावट नोटांचे वाटप, पंढरपूरमध्ये मतदारांची फसवणूक

पंढरपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे मतांसाठी बनावट नोटांचे वाटप करत थेट मतदारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात घडला आहे. वाटप झालेल्या नोटा या लहान मुलांच्या खेळण्यातील असून या नोटांवर चिल्ड्रन्स बँक, पांच सौ नंबर, असा उल्लेख आहे. खऱ्या नोटेसारखी दिसणारी हुबेहूब ही नोट खऱ्या नोटेत घालून दिल्याने मतदारांना त्याचा थांगपत्ता लागला नाही.

कालचा दिवस पैसे गोळा करण्यात आणि मतदान करण्यात गेला. आज जमा झालेल्या पैशाची मोजदाद करताना यामध्ये बनावट नोटा आढळून आल्यावर फसवणूक झालेल्या मतदारांना धक्का बसला आहे. या विषयी तक्रार करावी तर स्वतःच कायद्याच्या अडचणीत असल्याने, तेरी भी चूप मेरी भी चूप, असा काहीसा प्रकार झाला आहे.

दरम्यान, पंढरपूर विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली. मतदारांना प्रालोभित करण्यासाठी उमेदवारांनी अनेक फंडे वापरले. खेळ पैठणीचा, साडी वाटप, कुस्ती स्पर्धा, देवदर्शन यात्रा आदी, नंतर शेवटचा फंडा होता लक्ष्मी दर्शनाचा. पाचशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयापर्यंत एक मताचा भाव पडला होता. या मतदारसंघात चौरंगी लढत असल्याने, आपले पैसे प्रत्येक मतदारांपर्यंत कसे पोहोचतील याची काळजी उमेदवाराकडून घेतली जात होती. त्यामुळेच काल रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काहींनी मतदारांना बनावट नोटा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.