हरिनामाच्या गजराने पंढरी दुमदुमली, कार्तिकी एकादशीचा आज मुख्य सोहळा

‘अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर’ अशा अभंगाची प्रचीती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूरचा कार्तिकी एकादशीचा सोहळा आज मंगळवारी (12 रोजी) भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. संतांच्या दिंड्या दाखल झाल्या असून, पंढरीत चार लाख भाविक दाखल झाले आहेत. यंदा पाऊसमान चांगला झाला असल्याने राज्यभरातून आलेल्या वैष्णवांनी केलेल्या हरिनामाच्या गजराने पंढरी दुमदुमली आहे.

पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेकरिता एसटी, रेल्वे, खासगी वाहनांची तसेच दिंड्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. दशमी दिवशी चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्तीमार्ग, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेला आहे. 65 एकर भक्तिसागरात 2 लाखांहून अधिक भाविक वास्तव्य करीत आहेत. येथील तंबू, राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले आहेत. यंदा भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त

वाढली आहे. त्यामुळे दर्शनरांग चार किमी अंतरावर पोहोचली आहे. आणखी दर्शनरांग पुढे सरकत चालली आहे. मुखदर्शन रांगही मंदिरापासून विठ्ठल अन्नक्षेत्रापासून पुढे संभाजी महाराज पुतळा ते काळा मारुतीपर्यंत दर्शनरांग सरकली आहे. एकादशीदिवशी येथूनही पुढे चौफळ्यापर्यंत मुखदर्शन रांग जाते. मुखदर्शनासाठीदेखील चार तास लागत आहे. भाविकांच्या उपस्थितीने शहरातील व उपनगरातील मठ, मंदिर, भक्तनिवास हाऊसफुल्ल झाली आहेत.

चंद्रभागेत मुबलक पाणी असल्यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे. या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून जीवरक्षक दलाच्या स्पीड बोटी, तसेच 1 हजार 625 पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत. 300 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर भाविकांवर आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी नामदेव पायरीकडे येणाऱ्या भाविकांमध्ये विठूमाऊलीच्या नामाचा उत्साह दिसून येत आहे.

प्रासादिक साहित्यांनी बाजारपेठ फुलली

कार्तिकीनिमित्त प्रासादिक साहित्याची दुकानेदेखील फुलली आहेत. पेढे, बुक्का, जपमाळा, देवदेवतांच्या मूर्ती, फोटो फ्रेम आदी खरेदीसाठी भाविक पसंती देत आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर व परिसरात प्रासादिक साहित्यांची दुकाने उभारल्याचे दिसून येते. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांकडून प्रासादिक साहित्य, फोटोफ्रेम, मूर्ती, जपमाळा त्याचबरोबर जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यास भाविक प्राधान्य देत आहेत. भाविक व नागरिकांची मागणी लक्षात घेता व्यापारी व दुकानदार यांच्याकडून दखल घेत सेवा पुरवली जात आहे. यामुळेदेखील भाविकांनी बाजारपेठ बहरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.