व्हिआयपी दर्शन बंद ठेवण्याची भाविकांची मागणी, वशिलेबाजांमुळे वयोवृध्द भाविकांच्या समस्येत भर

>> सुनील उंबरे

आषाढी एकादशीच्या सोहळ्याला आठवडाभराचा अवधी असताना पंढरीत तोबा गर्दी झाली असून श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर पत्राशेड मध्ये पोहचली आहे. देवाच्या पदस्पर्श दर्शनासाठी आठ ते दहा तासांचा अवधी लागत आहे. वशिलेबाज भाविकांना शॉर्टकट मार्गाने दर्शन देण्याची सुविधा मंदिर समितीने आजही सुरुच ठेवल्याने, दर्शन रांगेतील भाविकांमधून समितीच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गर्दीच्या कालावधीत कोणत्याही व्यक्तीला शॉर्टकट दर्शन देवू नये असा महाराष्ट्र शासनाचे राज्यातील सर्व देवस्थानांना निर्देश दिले आहेत. मात्र पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने या अध्यादेशाला केराची टोपली दाखविली आहे. खुषकीच्या मार्गाने दररोज शेकडो भाविकांना पाच मिनिटांमध्ये व्हीआयपी दर्शन दिले जाते आहे. मुख्य दर्शन रांगेत जेंव्हा हे भाविक घुसखोरी करतात तेंव्हा त्या ठिकाणी भाविकांमध्ये वादविवाद होवून प्रकरण गुद्दगुद्दी पर्यंत जात आहे. काही मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, मंदिर समितीचे सदस्य, पैसे घेवून शॉर्टकट दर्शन देणारे एजंट आदी मंडळींच्या वशिल्याचे लोक शॉर्टकट मार्गाने दर्शनाला सोडले जात आहेत.

ही संख्या शेकडोच्या घरात असल्याने, दर्शन रांगेत उभा असलेल्या सर्वसामान्य भाविकांच्या वेळेत अधिकची भर पडते आहे. एक मिनिटामध्ये तीस ते पस्तीस भाविकांना दर्शन दिले जात असल्याचा दावा समितीकडून केला जात असताना सामान्य भाविकांची दर्शन रांग मात्र मुंगीच्या गतीने चालत असते. जिल्हाधिकारी कुमार विश्वास यांनी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना वारी सुखकर व्हावी यासाठी अतिशय सूक्ष्म नियोजन केले आहे. प्रत्येक नियोजनावर ते बारीक लक्ष ठेवून आहेत मात्र त्यांच्या नजरेआड मोठ्या प्रमाणात व्हीआयपीच्या शॉर्टकट दर्शना व्यवस्था सुरु आहे ती बंद करण्यासाठी त्यांनी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे.