पंढरपूर शहरातून चोरीस गेलेल्या सहा दुचाकींसह रिक्षा केल्या जप्त; शहर पोलीस, गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या सहा दुचाकी आणि एक ऑटो जप्त करण्यात पंढरपूर शहर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

अरुण राम भापकर (अकोली, ता. गंगाखेड, जि. परभणी), तेजस मोहन परदेशी (रा. लोखंडे वस्ती, पंढरपूर), मोहन दगडू पळसे (रा. तपकिरी शेटफळ, ता. पंढरपूर), आनंदा मधुकर आपरे (रा. शिवरत्ननगर, पंढरपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पंढरपूर शहरातील कोळी गल्ली येथील पवन आधटराव यांची नवीन पूल पंढरपूर येथून होंडा कंपनीची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल, बाळकृष्ण डोरले (रा. इसबावी) यांची स्प्लेंडर, मनोज कुंभार (रा. इसबावी) यांची सी. बी. ट्रिगर मोटारसायकल, योगेश लिंगडे (रा. विप्रदत्त घाट, पंढरपूर) यांची स्प्लेंडर मोटारसायकल, बंडू मारुती सुरवसे (रा. उमानगर, इसबावी) यांची स्प्लेंडर मोटारसायकल, तर भगवंत शंकर व्होनमाने (रा. जामगाव बुद्रूक, ता. मोहोळ) यांची स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल पंढरपूर शहरातून चोरीस गेली होती.

याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. सदर गुन्हय़ांचा तपास पोलीस हवालदार सचिन हेंबाडे, बिपीनचंद्र ढेरे हे करीत असताना तांत्रिक तपास करून त्यांनी मोटारसायकल चोरांचा शोध घेतला. यामध्ये आरोपी अरुण राम भापकर (अकोली, ता. गंगाखेड, जि. परभणी), तेजस मोहन परदेशी (रा. लोखंडे वस्ती, पंढरपूर), मोहन दगडू पळसे (रा. तपकिरी शेटफळ, ता. पंढरपूर) यांनी 1 लाख 45 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा दुचाकी व 1 लाख रुपये किमतीची सचिन दत्तात्रय धुमाळ यांची रिक्षा आरोपी आनंदा मधुकर आपरे (रा. शिवरत्ननगर, पंढरपूर) याच्याकडून जप्त केली आहे. या गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कदम हे करीत आहेत.