पंढरपूरजवळ बस व ट्रकचा भीषण अपघात, दोन भाविकांचा मृत्यू; 32 जखमी

पंढरपूरजवळ एका प्रवासी बस व ट्रकचा रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून 32 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

पुण्यातील मावळ तालुक्यातील कामशेत गावातील काही भाविक नंदनी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांची बस पंढरपूरच्या दिशेने जात असताना भटुंबरे गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकची व बसची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात. दोन भाविकांनी जागीच प्राण सोडला. बेबाबाई महाळसकर वय (५५) व जनाबाई महाळसकर अशी दोन मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. दरम्यान जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील 12 जणांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.