
पंढरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी झालेल्या गुह्याचा तपास लावण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. यामधील एकूण 16 गुन्हे उघडकीस आले असून, एकूण 34 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 24 लाख 4 हजार रुपये आहे.
पंढरपूर शहरात श्री विठ्ठल दर्शनासाठी येणाऱया भाविकांचे दागिने आरोपींनी चोरले होते. एसटीमध्ये जागा पकडण्यासाठी चढत असताना भाविकांच्या अंगावरील सोन्याचे मौल्यवान दागिने चोरीचे गुन्हे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. तसेच शहरात सुरू असलेल्या शिवपुराण कार्यक्रमादरम्यान झालेल्या गर्दीत आरोपींनी चोरी केली होती. या सर्व गुन्हय़ांचा तपास पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक करीत होते. पोलीस पथकाने पंढरपूर शहर व परिसरातील एसटी स्टॉप, नवीन एसटी स्टॅण्ड व एसटी थांबण्याची ठिकाणे येथे येणाऱया गुन्हेगारांची माहिती मिळविली.
पंढरपूर शहर व इतर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील आरोपी सखाराम उर्फ सिकंदर छगन वाघमारे (रा. नाळवंडी नाका, बीड), शाहरूख हमीद पठाण (रा. शहनशाहनगर, बीड), अर्जुन भीमराव बाबर (रा. पूरग्रस्त कॉलनी, बीड), रत्नाबाई बळी शेंडगे (रा. इंदापूर), ताई नाना दुबळे, सुजाता युवराज बाबर, नितीन धर्मा किरतकरवी (तिघेही रा. कोरफळे, ता. बार्शी, जि. सोलापूर), शंकर विठ्ठल झेंड (रा. पंढरपूर), महानंदा राम राठोड (रा. कानडी पिंपळगांव, ता. गेवराई, जि. बीड), राजेंद्र मोहन काळे (रा. कामती रोड, मोहोळ), राणी सखाराम उर्फ सिकंदर वाघमारे (रा. माळवंही नाका, बीड), रतन बळी शेंडगे (रा. आश्रमशाळा रोड, साठेनगर, इंदापूर), सोन्या उर्फ सोमनाथ उर्फ लाल्या ईश्वर भोटाले (रा. बेलगांव, ता. कर्जत, जि. सोलापूर) यांच्याबाबत माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून सदर आरोपींच्या गावी बीड, कोरफळे, इंदापूर, सांगोला आदी ठिकाणी जाऊन सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत साथीदारांसह एसटी स्टॅण्ड, मंदिर परिसरात तसेच गर्दी होणारे मठ, शिवपुराण कार्यक्रमावेळी व बंद घरातील सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली.