
गुन्हे शाखेच्या नार्कोटिक्स युनिटचा अधिकारी असल्याची बतावणी करत दादर येथील एका पानटपरीवाल्याकडील रोकड व मोबाईल घेऊन पसार झालेल्या एका सराईत भामटय़ाला गुन्हे शाखा युनिट-3 ने पकडले.
अल्ताफ मोहम्मद जकीर उल्ला खान (48) असे त्या भामटय़ाचे नाव आहे. दादरच्या धनमिल नाका परिसरात वीरेंद्र दुबे (44) याची पानटपरी आहे. दुबे हा जगन्नाथ भातणकर मार्गावरून पायी जात असताना अल्ताफने त्याला अडवले. गुन्हे शाखेच्या नार्कोटिक्स युनिटचा अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. तू टपरीवर गुटखा विकतोस. त्यामुळे तुझ्यावर कारवाई करत असल्याचे सांगून अल्ताफने दुबेला टॅक्सीत बसवले आणि क्रॉफर्ड मार्पेटच्या दिशेने घेऊन गेला. दरम्यान, अल्ताफने दुबेकडील चार हजारांची रोकड आणि मोबाईल काढून घेतला. त्यानंतर एकेठिकाणी टॅक्सी थांबवून मी माझ्या ऑफिसला जाऊन येतो असे सांगत अल्ताफ गेला तो सटकलाच. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुबेने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने समांतर तपास सुरू केला. परंतु आरोपी वसई, अंबरनाथ, नवी मुंबई, पालघर आदी ठिकाणी लपून राहत होता. अखेर तो कोपरी गाव येथे येणार असल्याचे कळताच पथकाने तेथे जाऊन त्याला उचलले. पुढील कारवाईकरिता अल्ताफला दादर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.