पालघरला सिकलसेलचा विळखा, सोळाशे रुग्ण आढळले; आरोग्य विभागाची उडाली झोप

पालघरमध्ये सिकलसेल आजाराचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. पालघरला सिकलसेलचा विळखा पडला असून तब्बल 1 हजार 609 रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच रुग्णांना मोफत औषधोपचार, रक्तपुरवठा, समुपदेशन करण्यात येत आहे. दरम्यान संजय गांधी निराधार योजनेंतर्गत आर्थिक लाभ देण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.

सागरी आणि डोंगरी अशी रचना आलेल्या पालघर जिल्ह्यात सिकलसेल रुग्णाबाबत डिसेंबर महिन्यात जनजागृती सप्ताह राबवण्यात आला. सिकलसेलबाबत नागरिकांना जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात आला. आरोग्य विभागातर्फे पालघर जिल्ह्यात 13 लाख 96  हजार 353 सिकलसेल तपासण्या करण्यात आल्या असून यात 1 हजार 609 सिकलसेलग्रस्त रुग्ण आढळले.

आजार नेमका काय ?

सिकलसेल हा रक्तपेशींची संबंधित आजार असून अनुवंशिक आहे. सिकलसेल या रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात. या पेशी रक्तवाहिन्या चिकटून राहतात. या भागातील रक्तपुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत रुग्णाला असह्य वेदना होतात. सिकलसेल रुग्णांना हाडे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळे, स्वादूपिंड, त्वचा, पित्ताशयावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. सिकलसेल आजारावर संपूर्ण उपचार नाही. मात्र यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. सिकलसेल रुग्णास नियमित आणि समतोल आहार आवश्यक आहे.

सिकलसेलची लक्षणे कोणती?

रणतातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे, हातापायावर सूज येणे, भूक मंदावणे, सांधे दुखणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, लहान बालकांना वारंवार जंतुसंसर्ग होणे, शरीर पिवळसर होणे.