पालघरमधील त्रिपल मर्डरचे रहस्य उलगडण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे. चोरीच्या उद्देशाने भाडेकरूने मालकाच्या कुटुंबाला संपवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पती-पत्नी आणि मुलीची हत्या करून आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेला होता. मात्र पोलिसांनी उत्तर प्रदेशातून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरिफ अन्वर अली असे आरोपीचे नाव आहे.
वाडा तालुक्यातील नेहरोली गावात राहणारे मुकुंद राठोड, त्यांची पत्नी कांचन राठोड आणि मुलगी संगीता राठोड यांचे मृतदेह 30 ऑगस्ट रोजी घरात आढळून आले होते. या हत्याकांडामुळे पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
राठोड यांचा मुलगा राजकोट येथे व्यवसायानिमित्त राहतो. तीन दिवसांपासून आई-वडिलांशी संपर्क होत नसल्याने आई-वडिलांना भेटायला मुलगा नेहरोली येथे आपल्या घरी आला. मात्र घराला कुलूप होते. मुलाने कुलूप तोडून आत प्रवेश केला असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आई आणि बहिणीचा मृतदेह बंद पेटीत तर वडिलांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला.
पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत या त्रिपल मर्डरचा पर्दाफाश केला. राठोड यांचा भाडेकरू आरिफ अन्वर अली यानेच त्यांच्या कुटुंबाला संपवल्याचे पोलीस तपासात उघड झाले. राठोड यांच्याकडे पैसे असतील असे समजून चोरीच्या उद्देशाने आरिफने डोक्यात हातोडा घालून तिघांची हत्या केली. त्यानंतर घरातील चार चांदीचे कॉईन घेऊन आरोपीने उत्तर प्रदेश गाठले.
आरोपीने प्रयागराजमध्ये चोरी केलेले चांदीचे कॉईन विकून 2100 रुपये मिळवले. पोलिसांनी शिताफीने हत्येचा उलगडा करत सात दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. हत्याकांडात आरोपीसोबत आणखी कुणी सामील होतं का याचा तपास पोलीस करत आहेत.