संपत्तीच्या वादातून दोन वर्षाच्या चिमुरडीसह आईची हत्या करून मृतदेह ओढ्यात फेकल्याची धक्कदायक घटना पालघरमधील मनोर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेचा दीर आणि नणंद यांना मनोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुष्मिता डावरे असे मयत महिलेचे नाव आहे. तर संदीप डावरे आणि सुमन करबत अशी आरोपींची नावे आहेत.
मनोर तालुक्यातील सावरे गावात डावरे कुटुंब राहत होते. सुष्मिताचा पती मासेमारी करायचा. तिला दोन वर्षांची मुलगी होती. सुष्मिता आणि तिचा पती प्रवीणचे कुटुंबासोबत संपत्तीवरून वाद होते. त्यामुळे ते दोघे आपल्या मुलीसह वेगळे राहत होते. तर आरोपी सुष्मिताच्या घराजवळच वेगळे राहत होते.
प्रवीण मासेमारीसाठी बोटीवर गेला असताना त्याचा भाऊ संदीप आणि बहीण सुमन यांनी सुष्मिता आणि तिच्या मुलीचा काटा काढला. संदीप आणि सुमनने आधी दोघींची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर सुष्मिताच्या गळ्यात दगड बांधून तिचा मृतदेह ओढ्यात फेकला. तर सुष्मिताच्या मुलीचा मृतदेह तेथून चार किमी अंतरावर फेकला.
सोमवारी दुपारी सुष्मिताचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना मयत महिलेची दोन वर्षाची मुलगीही बेपत्ता असल्याचे कळले.
यासंदर्भात पोलिसांनी महिलेचा दीर संदीपकडे चौकशी केली असता सुरूवातीला त्याने आपल्याला काही माहित नसल्याचा बनाव केला. मात्र नंतर त्याने वहिनी आणि पुतणीची हत्या केल्याची कबुली देत सर्व घटनाक्रम सांगितला. तसेच बहिणीचाही हत्याकांडात सहभाग असल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी मृतदेह पाण्यातून काढत शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदन अहवालात मायलेकींची गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. मनोर पोलीस पुढील तपास करत आहेत.