![jawhar](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/jawhar--696x447.jpg)
आदिवासींच्या विकासाच्या नावाखाली दरवर्षी शेकडो कोटींचा निधी मंजूर केला जातो. मात्र हा विकास कागदावरच राहत असल्याने मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जव्हार, मोखाड्यातील जनतेला अनेक समस्यांच्या नरकयातना भोगाव्या लागत आहेत. यावरून जव्हारचे माजी नगराध्यक्ष अॅड. राजाराम मुकणे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली असून शहरात बॅनर लावून त्यांनी जव्हार, मोखाडा तालुक्यांचा विकास करा हो, असा टाहो फोडला आहे. सरकारला जाग आली नाही तर जनआंदोलन उभारू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतरही आदिवासी तालुक्यांचा विकास हवातसा झालेला नाही. अनेक योजना जाहीर केल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने विकास कागदावरच राहिला आहे. या पार्श्वभूमीवर जव्हारचे माजी नगराध्यक्ष राजाराम मुकणे यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने आदिवासी भागाच्या प्रलंबित विकासकामांसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच केंद्रीय व राज्य मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन लक्ष वेधले आहे. मात्र आश्वासनापलीकडे ठोस असे काहीच हाती लागलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मुकणे यांनी जव्हार शहरात बॅनर लावून सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आवाज उठवला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याकडे वेधले लक्ष
ठाणे-जव्हार-नाशिक हा रेल्वेमार्ग अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. माजी रेल्वेमंत्री राम नाईक यांनी 30 जून 1999 रोजी यासंदर्भात लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही हा प्रकल्प लटकला आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली असल्याने दरवर्षी आदिवासींचे तांडे कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे या तालुक्यांचा विकास करायचा असेल तर औद्योगिक वसाहतींची निर्मिती करणे, पर्यटनस्थळांचा विकास, कृषी महाविद्यालयाची स्थापना करून प्रशिक्षण वर्ग सुरू करणे तसेच अत्याधुनिक रुग्णालयांची उभारणी, ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी जनसेवा आधारित सन्मान योजना यांसह अन्य प्रश्नांकडे मुकणे यांनी लक्ष वेधले आहे.