पालघरमध्ये भाजपचा वाल्मीक कराड पॅटर्न, शासकीय जमिनींच्या बेकायदा खरेदीची केली दुय्यम निबंधकाकडे अधिकृत नोंदणी

प्रातिनिधिक फोटो

शासकीय आणि वर्ग दोनच्या जमिनींची सर्वसाधारण जमिनीप्रमाणे खरेदी-विक्री होत नसली तरी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी या जमिनी हडप करण्यासाठी चक्क त्यांची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करून घेतली आहे. भाजपवाल्यांचा हा जमिनी हडप करण्याचा वाल्मीक कराड पॅटर्न उघड झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. प्रशासनाने केलेल्या चौकशीत भाजपचे पदाधिकारी आणि डहाणूचे दुय्यम निबंधक दोषी आढळून आले. मात्र राजकीय दबावापोटी या दोषींवर कारवाई करण्यास प्रशासनाने आता टाळाटाळ सुरू केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

डहाणू तालुक्यातील आसनगाव येथील वर्ग दोनच्या जमिनींचे बेकायदेशीर साठे करार, कुलमुखत्यार पत्र, रजिस्टर नोंदणी झाल्याचा प्रकार घडला आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विट करून या बेकायदा प्रकारावर प्रकाश टाकला. त्यानंतर पालघरचे जिल्हाधिकारी यांनी दुय्यम निबंधक यांना पत्र काढून 24 तासात खुलासा द्यावा असे आदेश दिले. मात्र दुय्यम निबंधकांनी दिलेला खुलासा दिशाभूल करणारा आहे.

प्रत्यक्षात जमीन खरेदीच्या उद्दिष्टाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या वर्ग दोनच्या जमिनीची कुलमुखत्यारपत्र व साठे करार नोंदणी केले होते. हा प्रकार नियमबाह्य असतानाही यावर पांघरूण टाकण्याचे काम निबंधक कार्यालयासह जिल्हा प्रशासनाने केले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे कटकारस्थान या अधिकारीवर्गाला हाताशी धरून केल्याच्या आरोप होत आहेत, तर दुसरीकडे सरकारच्या दबावाखाली अधिकारीवर्ग दोषींवर कारवाई करत नसल्याचेही आरोप केले जात आहेत.

डहाणू उपनिबंधकांनी आसनगाव येथील सर्व्हे नंबर 171, 172 मधील शासनाच्या मालकाच्या 49 हेक्टरपैकी तीन हेक्टर मालकीच्या जमिनीचे साठे करार व कुलमुखत्यार पत्र यांची नोंदणी 1 जानेवारी 2025 रोजी केली होती.

महसूल नियमानुसार अशा प्रकारची नोंदणी नियमबाह्य किंवा बेकायदा आहे. तरीही दुय्यम निबंधकांनी ही नोंदणी केलीच कशी असा प्रश्न निर्माण झाला.

भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांनी इतर राजकीय मंडळींना हाताशी घेऊन या जमिनीचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे.