आईसमान शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्रीपद मिळवणारे एकनाथ शिंदे यांचा बुरखा मिंधे गटाचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनीच आज टराटरा फाडला. वनगा यांना झुलवत ठेवून ऐनवेळी मिंध्यांनी भाजपमधून आयात केलेल्या राजेंद्र गावीत यांना तिकीट दिले. त्यानंतर वनगा मीडियासमोर अक्षरशः धायमोकलून रडले. उद्धवजी हे देवमाणूस आहेत. त्यांच्यामुळेच मी आमदार झालो. मिंध्यांसारख्या घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला. मिंध्यांसोबत गेलो ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक आहे, अशी कबुली वनगा यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांच्यासारखा प्रामाणिक माणूस कुठेही सापडणार नाही. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मला व माझ्या कुटुंबाला खूप मोठा आधार दिला होता. त्यावेळी उद्धव साहेबांनी मला पालघर लोकसभेसाठी तिकीट जाहीर केले होते, पण एकनाथ शिंदे हा षडयंत्र करणारा माणूस आहे. त्यांनी मला मी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक नाही असे मला सांगायला लावले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही माझा पत्ता कट करण्यासाठी शिंदे यांनी डाव आखला होता, असा आरोप वनगा यांनी केला. मला उद्धवजींची माफी मागायची आहे. पण आता कोणत्या तोंडाने मी ‘मातोश्री’वर जाऊ? त्यांना काय सांगू? असे सांगत वनगा ढसाढसा रडले.
माझ्या पतीने आत्महत्या केली तर जबाबदार कोण?
आश्वासन देऊन तिकीट कापल्याने श्रीनिवास वनगा यांनी दोन दिवसांपासून स्वतःला कोंडून घेतले आहे. अन्न आणि पाणी सोडले आहे. त्यांनी आत्महत्या केल्यास कोण जबाबदार, असा सवाल श्रीनिवास यांची पत्नी सुमन वनगा यांनी केला.