तीन विकेटसह अर्धशतकी खेळी करणाऱ्या शार्वी सावेचा अष्टपैलू खेळ पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचा पराभव टाळू शकला नाही. 40 षटकांच्या एकदिवसीय अर्जुन मढवी महिला क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने डहाणू-पालघर तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचा 43 धावांनी पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळवले. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या 228 धावांचा पाठलाग करताना पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनला 9 बाद 185 धावा करता आल्या.
प्रथम फलंदाजी करताना अनुभवी पूनम राऊतने संघाच्या द्विशतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. पूनमने नऊ चौकारांसह 75 चेंडूंत 78 धावा बनवल्या. अनिशा शेट्टीने 30 आणि सारा सामंतने 28 धावांची खेळी केली. ययाती गावडने चार आणि शार्वी सावेने तीन फलंदाज बाद केले. या आव्हानाला सामोरे जाताना शार्वीने 67 चेंडूंत एक षटकार आणि 11 चौकारांसह 81 धावांची खेळी करत संघाला विजयाची आस दाखवली, पण ती बाद झाल्यावर मात्र स्नेहलता धनगड आणि लिली दीपचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली. स्नेहलता आणि लिलीने प्रत्येकी 26 धावांची खेळी केली. अदिती सुर्वे, सिद्धी पवार आणि क्रितिका क्रिष्णकुमारने प्रत्येकी दोन विकेट मिळवले.
संक्षिप्त धावफलक – दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन – 40 षटकांत 9 बाद 228 (पूनम राऊत 78, अनिशा शेट्टी 30, सारा सामंत 28, ययाती गावड 8-50-4, शार्वी सावे 8-34-3, शुभ्रा राऊत 8-30-1) विजयी विरुद्ध पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन – 40 षटकांत 9 बाद 185 ( शार्वी सावे 81, स्नेहलता धनगड 26, लिली दीप 26, अदिती सुर्वे 8-1-22-2, सिद्धी पवार 7-0-31-2, क्रितिका क्रिष्णकुमार 8-1-43-2) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – पूनम राऊत