महिलांच्या अत्याचारावरील घटना थांबता थांबत नसून पालघर जिल्ह्यातील वाडा येथे तर अत्याचाराने कळस गाठला आहे. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर या घटनेची कुठे वाच्यता केली तर ठार मारेन, अशी धमकीदेखील देण्यात आली. विकास पवार असे या नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान त्याला न्यायालयात हजर केले असता २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे नर्सिंगच्या अन्य विद्यार्थिनींमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून राज्यात चाललंय तरी काय, असा सवाल विचारण्यात येत आहे.
वीस वर्षीय पीडित मुलगी मूळची वाडा येथील असून कुडूस येथे एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत आहे. ती आपल्या मैत्रिणींसोबत एका घरामध्ये भाड्याने राहते. वडील बुधवारी मुलीला भेटण्यासाठी वाड्याहून आले होते. त्यांच्यापाठोपाठ विकास पवार हा तरुण दुचाकीवरून आला. वडील व तरुणीला मी तुम्हाला गावात घरी सोडतो असे सांगून त्याने दोघांनाही आपल्या मोटारसायकलवर बसवले. गावाच्या वेशीजवळ आले असताना विकास याने तिच्या वडिलांना अर्ध्या रस्त्यात उतरवून तुम्ही शॉर्टकटने जा मी मुलीला घेऊन येतो असे सांगितले.
एका व्यक्तीकडून पैसे घ्यायचे असल्याने तेथे जात असल्याची बतावणीदेखील नराधमाने केली व विद्यार्थिनीला तो मोटारसायकलवर सोबत घेऊन गेला. पण प्रत्यक्षात सांगितलेल्या ठिकाणी न जाता विकास पवार याने पीडित मुलीला जंगलामधील एका निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने तिला बेदम मारहाण करून घाबरवले. एवढेच नव्हे तर जबरदस्तीने निर्वस्त्र करून विद्यर्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. ती जीवाच्या आकांताने वाचवा.. वाचवा असे ओरडत होती. पण आजूबाजूला जंगल असल्याने कुणीही मदतीला धावले नाही. हा प्रकार कोणालाही सांगितला तर मी तुला जीवे ठार मारून टाकेन, अशी धमकी मुलीला दिली.
वाट तुडवत पोलीस ठाणे गाठले
अत्याचारानंतरही विकास याच्या धमकीला न घाबरता विद्यार्थिनीने जंगल तुडवत वाडा पोलीस ठाण्याचा रस्ता धरला. तिच्यासोबत झालेला अतिप्रसंग पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून जोरदार तपास सुरू केला. तपासाची चक्रे फिरवल्यानंतर पोलिसांनी विकास पवार याच्या मुसक्या आवळल्या.