नोकरीचे आमिष दाखवून लुटणाऱ्या जावयाची सासऱ्याने केली हत्या, झोपेत असतानाच डोक्यात कुऱ्हाड घातली

सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या जावयाचा सासऱ्याने काटा काढल्याची घटना वाडा तालुक्यातील कवटे पाडा येथे घडली आहे. जावयाच्या या कारनाम्यामुळे सासऱ्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी झोपेत असलेल्या जावयाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी होऊन जागीच मृत पावला. याप्रकरणी वाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सासऱ्याला अटक केली आहे.

कवटे पाडा येथे राहणारे जानू कवठे यांच्या मुलीबरोबर युवराज जगताप याचा प्रेमविवाह झाला होता. जानू यांची मुलगी एसटी महामंडळात नोकरीला आहे. जावई युवराज हा बेरोजगार होता. तो कोणते काम करीत नव्हता. मात्र गेल्या काही वर्षांपासून सरकारी नोकरी लावतो असे आमिष दाखवून त्याने अनेकांची फसवणूक सुरू केली होती. त्याच्या या कारनाम्यामुळे सासरे जानू यांचा त्याच्याबरोबर अनेक वेळा वादही झाला होता. मात्र त्यानंतरही युवराजच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. तो नोकरीचे आमिष दाखवून अनेकांकडून लाख ते चार लाख रुपये उकळतच राहिला. युवराजचे मूळ गाव सातारा जिल्ह्यात असले तरी सध्या तो कवठे पाडा येथे राहत होता. जावयाच्या या कारनाम्यामुळे हैराण झालेल्या सासऱ्याने शेवटी हे टोकाचे पाऊल उचलले.

वर्तनात सुधारणा होईना

जावयाच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने जानू कवठे संतापले. त्यांनी संतापाच्या भरात जावयाला संपवण्याचा कट केला. त्यानुसार ते जावयाच्या घरी गेले. जावई झोपेत असताना जानू यांनी त्याच्या मानेवर आणि डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले. या हल्ल्यात युवराज गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वाडा पोलिसांनी आरोपी जानू कवठे याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.