
दहशतीचा वाल्मीक कराड बीड पॅटर्नमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळलेली असताना असाच प्रकार आता पालघरमध्येही उघडकीस आला आहे. भाजपचे उपाध्यक्ष आणि नगरसेवकाने जमिनीच्या वादातून तिघांवर हल्ला केला. विशेष म्हणजे ही मारहाण पालघर पोलीस उपअधीक्षक कार्यालयासमोर झाली. या मारहाणीचा व्हिडीओही उपलब्ध आहे. मात्र पोलीस राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करून घेत नाहीत. हल्लेखोरांच्या इशाऱ्यांवरून मारहाण झालेल्या तिघांना त्रास देणे सुरू आहे. हे तिघे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्याकडे 11 लाख रुपयांची खंडणी घेतली.
भाजपचे उपाध्यक्ष अरुण माने व त्याचा भाऊ महेंद्र माने यांनी जमिनीच्या वादातून रोहित घुटकुडे, सागर घुटकुडे, सुहास गोरड व इतरांना बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे हा हल्ला पोलीस उपअधीक्षक कार्यालयासमोर झाला. मारहाण झालेले पीडित पालघर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस अधिकारी आप्पासाहेब लेंगरे यांनी त्यांच्याकडे ११ लाखांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली.
■ घाबरलेले तक्रारदार घुटकुडे यांनी हा वाद आपसात मिटवून टाकू असे माने यांना म्हटले यावर माने यांनी पोलिसांशी संगनमत करून पोलीस अधिकारी आप्पासाहेब लेंगरे यांना सहा लाख रुपये तर मला पाच लाख रुपये द्यावे लागतील असा दम त्यांना भरला.
■ घुटकुडे यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार घुटकुडे यांच्यासोबत असलेले सायरस इराणी, दरायस इराणी हे दोघे माने यांचे मित्र अविनाश श्रीवास्तव, तेजेंद्रसिंग आणि संजय शेट्टी यांच्यासह विरारला पैसे आणण्यासाठी गेले.
■ विरार येथून 11 लाख रुपये घेऊन हे पैसे सायरस व दरायस इराणी यांनी महेंद्र माने यांच्याकडे शेलवली पेट्रोल पंपावर दिले. त्यानंतर पोलिसांनी तक्रार देण्यासाठी आलेल्या घुटकुडे आणि इतरांना सोडून दिले.
गृहमंत्र्यांनी दखल घेतली नाही
अरुण माने आणि त्यांच्या गुंडांनी मारहाण केल्यानंतर रोहित घुटकुडे यांनी तत्कालीन गृहमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र पालघरमध्ये दहशत पसवणारे हे गुंड भाजपचे असल्याने त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. उलट घुटकुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी डांबून ठेवून त्यांच्याकडून 11 लाखांची खंडणी उकळली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
चौकशीत मारहाण झाल्याचे उघड
रोहित घुटकुडे यांनी पोलीस महानिरीक्षकांकडे मे 2023 मध्ये याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार तत्कालीन उपविभागीय अधिकारी नीता पाडवी यांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आले. पाडवी यांनी केलेल्या चौकशीत रोहित घुटकुडे व त्यांच्या साथीदारांना माने आणि त्यांच्या गुंडांनी मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. विरारहून सायरस इराणी व दारायस इराणी व इतर जणांनी 11 लाख रुपये आणून माने यांना दिले. रोहित घुटकुडे याला मारहाण झाल्यानंतर तो गंभीर जखमी झाला, असा अहवाल पोलीस महानिरीक्षकांना पाठवला आहे