विरार ते पालघर पहिली रो-रो फेरी बोट ऐटीत निघाली, शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सेवेचा शुभारंभ

पालघर आणि विरारला जलदगतीने जोडणाऱ्या रो-रो सेवेचा शनिवारी शुभारंभ झाला. शुभारंभाच्या कार्यक्रमाला अनेक नागरिकांनी उपस्थिती लावत या सेवेचे जोरदार स्वागत केले. दुपारी 12 वाजता विरारच्या नारंगी येथून पहिली रो-रो बोट पालघरच्या जलसारकडे रवाना झाली. ही बोट अवघ्या दहा मिनिटांत खारवाडेश्री (जलसार) येथे पोहोचली असून या सेवेमुळे हजारो प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत या प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. या प्रकल्पाला 26 ऑक्टोबर 2017 रोजी 12.92 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. नंतर 15 मार्च 2023 रोजी 23.68 कोटी रुपयांच्या या सुधारित प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराला फेब्रुवारी 2024 मध्ये काम देण्यात आले होते. दरम्यानच्या काळात पर्यावरणविषयक तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाकडून या कामाबाबत परवानगी प्राप्त झाली होती. अखेर आज दुपारी 12 वाजता विरारच्या नारंगी येथून पहिली रो-रो बोट पालघरच्या जलसारकडे रवाना झाली. यावेळी दोन्ही ठिकाणी नागरिकांनी उपस्थित राहून या रो-रो सेवेचे स्वागत केले. खारवाडेश्री ते नारंगी असे रस्तामार्गे अंतर 60 किलोमीटर असून त्याला दीड तासांचा कालावधी लागतो. मात्र जलमार्गामुळे अवघ्या 15 मिनिटांच्या कालावधीत हे अंतर कापता येणार आहे.

सकाळी साडेसहा वाजता पहिली फेरी
20 एप्रिलपासून प्रायोगिक तत्त्वावर सकाळी 6.30 वाजता विरार येथून पहिली फेरी निघणार आहे. अखेरची फेरी सायंकाळी 7 वाजता खारवाडेश्री येथून निघणार आहे. अखेरची फेरी रात्री 10.10 वाजता खारवाडेश्री येथून विरारसाठी निघणार आहे. विरार ते खारवाडेश्रीदरम्यान मोटारसायकलसाठी 66 रुपये, रिकामी तीनचाकी रिक्षासाठी 110, लहान चारचाकी 200, मोठ्या चारचाकी व रिकामी मध्यम मालवाहू जड वाहनांसाठी 220 रुपये अशी दर आकारणी निश्चित करण्यात आली आहे. याच बरोबरीने प्रौढ प्रवाशांना 30, लहान मुलांना 15, मासे, फळे (टोपली), शेळी, मेंढी, कुत्रा यांना प्रति नग ४0 रुपये तर कोणत्याही मालवाहतुकीस प्रति अर्धा टन 30 रुपये अशी आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे.