पालघरमध्ये ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू, ईयर फोन बेतला जीवावर

मोबाईलच्या अतिवापरामुळे पालघरमध्ये एका विद्यार्थिनीला जीव गमावण्याची वेळ आली. कानात ईयरफोन घालून रेल्वे रुळ ओलांडताना विद्यार्थिनीची ट्रेनच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना सफाळे रेल्वे स्थानकाजवळ घडली. वैष्णवी रावल असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.

वैष्णवी ही सफाळे येथील माकणे गावातील रहिवासी असून, येथील इंग्लिश माध्यमाच्या शाळेत नववीत शिकत होती. गुरुवारी दुपारी वैष्णवी नेहमीप्रमाणे ट्यूशनला जात होती. रेल्वेमार्गावर पूल नसल्याने वैष्णवी रेल्वे रुळ ओलांडून पलिकडे जात असताना मुंबईच्या दिशेने येणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने तिला धडक दिली.

उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा करून वैष्णवीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कानात ईयरफोन असल्याने तिला ट्रेनच्या हॉर्नचा आणि नागरिकांचा आवाज ऐकू आला नाही. यामुळे ट्रेनने तिला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.