बोलण्याचे तारतम्य तर नाहीच आता आंधळेही झालात का? हरभजन सिंग ट्रोलर्सवर भडकला

पाकिस्तानी क्रिकेटचे चाहते हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या निशाण्यावर आहेत. हरभजन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. हिंदुस्थानच्या क्रिकेटपटूंविरोधात बोलणाऱ्यांना फैलावर घेतो. अलीकडेच एका पाकिस्तानी पत्रकाराने एमएस धोनीची मोहम्मद रिझवानशी तुलना केल्यामुळे हरभजनने त्याला धाऱ्यावर धरले होते. आता त्याने इरफान पठाणला ट्रोल करणाऱ्या एका पाकिस्तानी चाहत्याला फटकारले आहे.

बाबर आझम वर्ल्ड नावाच्या ‘एक्स’ अकाउंटवरील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बाबर आझम मॅचनंतर ड्रेसिंग रूममध्ये जाताना दिसत आहे. ‘जेव्हा इरफान पठाणने बाबर आझमला मुलाखतीसाठी विनंती केली आणि त्यांनी नकार दिला’, असे कॅप्शन त्या व्हिडिओला देण्यात आले आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये इरफान पठाण कुठेही दिसत नाहीय. त्यामुळे या पोस्टवरून हरभजन सिंग भडकला आहे.

हरभजनने त्या व्हिडीओलाच रिट्विट केले आहे. ‘या व्हिडीओमध्ये इरफान पठान कुठे आहे? कोणत्याही गोष्टीवर बोलण्याचे तारतम्य तुम्हाला आधीपासूनच नाही आता डोळ्यांनी पाहणं सोडून दिलंय का? बाय द वे, प्रश्न इंग्रजीत विचारलात तर अडचणीत याल, असे म्हणत हरभजनने ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हरभजनच्या प्रतिक्रियेनंतर अनेक चाहत्यांनी पाठिंबा दिला आहे.