30 वर्षांच्या संघर्षानंतर पाकिस्तानी सुनेला हिंदुस्थानचे नागरिकत्व!

लग्न करून कराचीतून नागपूर मुक्कामी आलेल्या पाकिस्तानी महिलेला 30 वर्षांच्या संघर्षानंतर हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळाले. नागपूरची सून बनलेल्या मूळ तेलुगु वंशीय कमला गट्टू यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मार्गाने नागरिकत्व मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना नागरिकत्व मिळवण्यासाठी पारंपरिक नियमांचाच आधार घ्यावा लागला.

कमला यांचा हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळविण्याचा प्रवास देशाची फाळणी, स्थलांतर व सांस्पृतिक ओळख असा गुंतागुंतीचा राहिला आहे. गेली 30 वर्षे त्या व्हिसावर हिंदुस्थानात राहत होत्या. मागील आठवडय़ात हिंदुस्थानचे नागरिकत्व प्राप्त झाले आणि त्या खऱया अर्थाने हिंदुस्थानी सूनबाई बनल्या आहेत. कमला यांचे दोन भाऊ अद्याप पाकिस्तानमध्येच राहत आहेत. हिंदुस्थानचे नागरिकत्व प्राप्त होण्यापूर्वी त्या केवळ दोनदा पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. नागरिकत्व मिळवण्याच्या प्रक्रियेत सुधारणा झाली पाहिजे. दोन्ही देशांतील सरकारने नागरिकत्वाच्या नियमांमध्ये शिथिलता आणावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.